ईटीव्हीत असताना अनेक अनुभव आले...चांगले कमी आणि वाईट जास्त होते. सगळ्यात महत्वाचं तत्व जे मी ईटीव्हीतून किंवा आत्तापर्यंतच्या अनुभवातून शिकलो ते म्हणजे काहीच निश्चित आणि शाश्वत नसतं, आज एखादा माणूस वर दिसतो तो दुस-या दिवशी असा खाली आपटेल की कोणी विचारही करू शकत नाही. त्यामुळे झटपट वर जाण्याच्या नादात लोकांकडून फक्त शिव्याशाप खाणारे अनेकजण मी जवळून बघितलेत ( सोप्या समजणा-या भाषेत यांना चाटुकारिता करणारे म्हणतात) आपली मतं दुस-याला पटली नाहीत तर ती दुस-यावर लादण्यापेक्षा शांत बसावं हे मी या काळातच शिकलो....
ईटीव्हीला मिनी भारत म्हटलं जायचं...संपूर्ण भारतातून इथे लोकं काम करत होते, हैद्राबादमध्ये रहात होते. भारताप्रमाणेच इथंही लोकांमध्ये एकोपा होता, भांडणं होती, आणि कंपूगिरीही होती. प्रत्येकाने आपापला गट बनवला होता तसा तो माझाही होता. मी ,सचिन फुलपगारे , आशिष चांदोरकर, अमित जोशी आणि सचिन देशपांडे एका घरात रहायचो, पण भांडणंही जबरदस्त व्हायची...अमित जोशी पातेलंभर चहा करायचा (अमितसमोर हा विषय काढला तर तो अजूनही वैतागतो) कुकरभर खिचडी करायचा आणि नंतर सगळं एकतर स्वतच खायचा किंवा फेकून द्यायचा. ज्यामुळे सगळे त्याच्यावर वैतागायचे. सचिन देशपांडे लवकर चिडायचा,त्यामुळे त्याचे आणि इतरांचे बरेचदा खटके उडायचे, आशिष चांदोरकर कधीच भांडायचा नाही पण लोकांना त्रास द्याची त्याची स्टाईल वेगळी होती. नीरव शांततेत, वाघाने डरकाळी फोडावी तसा आशिष घोरायचा...त्याला झोपेतून उठवलं आणि सांगितलं की घोरू नको तर वैतागायचा...बाईकचा फाटलेल्या सायलेंसर असेल तर तो कसा आवाज करेल सेम त्याच आवाजात घोरण्याची आशिषची खासियत होती. सुरवातीला त्रास झाला पण नंतर सवय झाली. मी आणि सचिन अनेकदा घरी नसायचो, आमच्या घरापेक्षा आम्ही शिरीश, दिपक आणि कोंपलवाराच्या बंगल्यावर पडलेलो असायचो, त्यामुळे घरातले अनेकदा वैतागायचे. नंतर एकमेकांना सगळ्यांचीच सवय झाली. सगळं सहन करायची आमची तयारी होती फक्त हातात पैसे नव्हते. ज्या पद्धतीने आम्ही घरखर्चाचं प्लॅनिंग करायचो ते बघण्यासारखं असायचं. बजेट लिहताना एकेका रूपयाचा हिशोब ठेवण्याच्या नादात भांडणं सुद्धा झालेली आहेत.
हे दिवस आयुष्यातले अत्यंत महत्वाचं आणि कसं जगायचं याचं कोचिंग देणारे दिवस होते. या कोचिंगसाठी ना कोणी गाईड होतं, आणि ना कोणता सिलॅबस...प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं शोधायचा, एक मित्र होता, ज्याचा प्रेमभंग झाल्याने गच्चीवर रडत बसला होता, त्याच्याकडे बघून मी मनातून घाबरलो होतो, मी मनात म्हणतच होतो हे सीन फक्त पिक्चरमध्ये पाहीलेत, रियल लाईफमध्ये हे पहिल्यांदाच बघत होतो. नंतर तो भाई पुन्हा लाईनीवर आला आणि आता जीवनात सॉलिड सुखी आहे. या संस्थेनं कोणाला पदं दिली, कोणाला मनस्ताप दिला, प्रत्येकाला काहीना काही तरी दिलं, काहींच्या पदरात चांगल्या गोष्टी पडल्या तर काहींच्या वाईट. मात्र काही लोकं अशी होती, ज्यांना आयुष्यभर लक्षात राहील अशी गोष्ट या संस्थेनं दिली ती म्हणजे सावलीप्रमाणे बरोबर फिरणारा नवरा किंवा बायको....
शिरीश जाधव-भाग्यश्री
दिपक शितोळे-अनुपमा,
सचिन जोशी-केतकी
ही काही मला माहिती असलेली उदाहरणं आहेत. माझ्या आधी आणि नंतर अनेक जणांना या संस्थेनं जीनवसाथी दिले. माझ्या आधीही या संस्थेमध्ये सूर जुळले आजही जुळत असतील आणि कदाचित नंतरही जुळत राहतील. म्हणून ईटीव्हीला गंमतीनं काही लोकं मॅरेज ब्युरोसुद्धा म्हणायचे...
ई टीव्ही ची अशीही ओळख मांडल्या बद्दल तुला धन्यवाद...(तुला आता आमच्यातर्फे अनलिमिटेड चहा..कधीपण ये)
ReplyDeleteअनेक सूर अजूनही जुळत आहेत.......गोपनीयतेच्या कायद्यामुळे नावं इथे देत नाही....
छान लिहिलय तुम्ही. आवडलं मला. Keep it up.
ReplyDelete- मुकुंद टाकसाळे
kukarbhar Khichadi ani char lok.....me khup chidto ?. thik aahe.
ReplyDeleteईटिव्हीतले शिरीन फरहाद म्हणजे शिरीष आणि भाग्यश्री. त्यांच्याबरोबरच हीर रांझा (सचिन केतकी) आणि सोनी महिवालच्या (दीपक अनुपमा) यांच्या आठवणींनाही तू उजाळा दिलास. त्याबद्दल सचिन, दीपक आणि शिरीषकडून तुला एक पार्टी लागू..आणि या तीनही जोड्यांना योग्य नावं सुचवल्याबददल मलाही.
ReplyDeleteसागर गोखले