नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन’ ने हा प्रयोग करून बघितलाय.
आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर
ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी
सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत
चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा
कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला
हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.
यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा
कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं
स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्टेशनमधला तो सुपरस्टार असतो. त्याची प्रेयसी एमी, मैत्रिण जीना, लेस्बिअन रोझा,
खास मित्र चार्ल्स हे सगळे एकत्र कुटुंबाप्रमाणे असतात.
यातला कोणीतरी प्रचंड गोंधळ घालतात आणि
सगळे मिळून निस्तरतात ही सगळ्या भागातील सामाईक गोष्ट आहे. कॅप्टन रेमंड होल्ट हा अख्ख्या
पोलीस दलातील पहिला गे कॅप्टन असतो. पोलीस आयुक्त बनण्याचे स्वप्न बनण्याचे स्वप्न
बघणारा रेमंड होल्ट अत्यंत कडक शिस्तीचा असतो. या कडक शिस्तीच्या कॅप्टनशी जुळवून
घेताना जॅक आणि त्याच्या साथीदारांची तारांबळ उडते. या सगळ्या गोंधळात रेमंड होल्ट
थोडा बिघडतो आणि जॅकसह त्याचे साथीदार थोडे सुधारतात. हा सगळा प्रकार ५ सीझनमध्ये
आणि १०० पेक्षा जास्त भागांमध्ये दाखवण्यात आला आहे.
मालिकेचा प्रत्येक भाग हा पुढचा भाग बघण्यासाठी उद्युक्त करणारा आहे. ज्यामुळे
प्रेक्षक हा व्यसनी झाल्याप्रमाणे ही मालिका बघत राहतो. प्रेक्षकांनी ही मालिका
डोक्यावर उचलून धरल्याने या मालिकेला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत यातील
पहिला पुरस्कार हा जॅक पेराल्टाची भूमिका साकारणाऱ्या अँडी सॅमबर्गला तर दुसरा पुरस्कार सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका
या विभागात मिळाला आहे. या मालिकेचे आत्तापर्यंत ५ सीझन आले असून सहावा सीझन
केव्हा येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये भयंकर उत्सुकता आहे. सहावा सीझन
येण्यापूर्वीच जिना लेनेटीची भूमिका साकारणाऱ्या चेल्सा पेरेटीने आपण या भागात काम
करणार नसल्याचं सांगून अनेकांना निराश केलं आहे. ती नसली तरीही पुढच्या भागाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.या पोलीस स्टेशनमध्ये जो काही
गोंधळ चालतो तो बघण्यासारखा आहे. त्यामुळे एकदा ही मालिका बघाच.
Comments
Post a Comment