Skip to main content

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते


भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे. 




मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्ये सांगितलेला आठवत नाही. पाऊस झाल्यानंतर अंदाज यायच की पुढचे ८ तास तास पावसाचा जोर वाढणार, अंदाजाने घाबरून लोकं घरी बसायचे मात्र त्या दिवशी पाऊसच पडायचा नाही. हे तर मी आजपर्यंत कित्येकदा बघितलेलं आहे. असं का होतं याचा गांभीर्याने विचार कोणी का करत नाही हा मला पडलेला स्वाभाविक प्रश्न आहे. 

गेल्या ३-४ वर्षांपासून हवामान खात्याविरूद्ध पोलिसांत तक्रार केल्याच्या बातम्या ऐकायला मिळायला लागल्या आहेत. खरंतर तक्रारींचं हे प्रमाण प्रचंड असायला हवं मात्र देशातील नागरीक बेफिकीर असल्याने तक्रारी होतच नाहीत . का होऊ नयेत तक्रारी? या खात्याने सांगितलेले अंदाज हमखास चुकतात, मोठ्या नैसर्गिक संकटांचे अंदाज वेळेवर मिळतच नाहीत. हे अंदाज न कळाल्याने नागरिकांचा पावसात वीज पडून, खड्ड्यात पडून, नदी नाल्यात बुडून, ड्रेनेजमध्ये बुडून मृत्यू होतो. मग या मृत्यूंसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारं, केंद्र सरकारं यांना जसे जबाबदार धरले जाते तसे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना का धरले जात नाही ?

२०१८ या वर्षासाठी भारतीय हवामान खात्याने अंतिम अंदाज जाहीर करताना म्हटलं होतं की यंदाचा देशभरातील पाऊस हा सरासरीएवढा म्हजेच सामान्य असेल.  पावसाचा संबंध काळ लक्षात घेता देशात ९७ टक्के पाऊस होईल असं हवामान खात्याचं म्हणणं होतं. गेल्या रविवारी हवान खात्याच्या मते पावसाने देशातू गाशा गुंडाळला. तेव्हा पाऊस तब्ल ९.४ टक्के कमी झाल्याचं कळालं होतं. साधारणपणे अंदाज कमी अधिक असण्याचं प्रमाणे  चार टक्के इतकं असतं. मात्र त्यापेक्षा जेव्हा जास्त होतं तेव्हा ती गंभीर चूक असते आणि या वर्षी ही चूक झालेली आहे. सप्टेंबर महिन्यात अंदाजापेक्षा २३ टक्के पाऊस कमी झालाय. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला नाही म्हणून सगळा अंदाज गडबडला असं सांगण्यात येतंय. हवामान खात्याने ऑगस्ट  सप्टेंबरसाठी शेवटचा अंदाज वर्तवला तेव्हा देशात ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला. खासगी हवामान संस्था स्कायमेटने याच सुमरास पाऊस सरासरीपेक्षा कमी होईल असं सांगताना ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात पाऊस झाला ८७ टक्के. स्कायमेट ही खासगी हवामान संस्था सरकारी खात्यापेक्षा या आकड्याच्या अधिक जवळ होती. इतर देशांना अचूक अंदाज मिळतात मग आपल्याला ते का मिळत नाहअसं महटल्यावर हवामान खात्याचे अधिकारी तिथलं वातावरण आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, त्या भौगोलिक परिस्थितीचा त्यांना फायदा होतो असं म्हणत हात झटकतात. असं किती दिवस चालायचं? खासगी संस्थांमध्ये छोट्या चुकांसाठी नोकरीवरून काढून टाकण्यात येतं. इथे देशातील लाखों शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या जीवनमरणाशी निगडीत अंदाज वर्तवायचा असतो, मात्र तो चुकला तर अधिकाऱ्यांना काहीच फरक पडत नाही, त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही.   बहुधा हे देशातील पहिलं आणि एकमेव खातं असं असावं जे सतत चुका करूनही त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही, चुका करूनही हे खातं प्रचंड आनंदात असतं.

Comments

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या...