नक्की दिवस आठवत नाही मात्र जवळपास 2002-2003 मध्ये मी ईटीव्हीमध्ये कामाला सुरवात केली. पहिली नोकरी, ती ही राज्याबाहेरची ,मुलगा एकटा बाहर जाणार कसा राहणार या काळजीने आईबाबा काहीसे चिंतेमध्ये होते. पण माझ्या मनात भीती नाही हे पाहून त्यांच्या मनातली भीती काहीशी कमी झाली होती. ही परिस्थिती फक्त माझ्या आईबाबांची होती असं नाही, नंतर आलेल्या अमित जोशी किंवा बाकीच्यांच्या घरीही जवळपास अशीच परिस्थिती होती.
कामाचा कुठेही अनुभव नव्हता, पाटी कोरी होती असा परिस्थितीत हैद्राबादचं रामोजी फिल्म सिटीमधलं ईटीव्हीचं ऑफीस बघितलं की भांबावल्यासारखं व्हायचं. नवीन होतो चुका व्हायच्याच होत्या. त्याकाळी अशा चुका केल्या ज्या मागे वळून पाहताना वाटतं की अतिशय शुल्लक होत्या. पण या सगळ्या चुका अनुभव नसल्यामुळे झालेल्या चुका होत्या. व्हीज्युअल्स मध्ये ब्लॅक जाणं, लोकांची नावं चुकीची जाणं (नावं माहिती असायची पण स्लग ऍस्टन मधील तांत्रिक बाबींमुळे ती चुकायची) या काळात मेघराज पाटील, गजाभाऊ कदम ही मंडळी डेस्क सांभाळायची आणि त्यांच्यावर अशोक सुरवसे होते. "काही" चुका वरिष्ठांनी माफ केल्या काहींबद्दल समजावलं, हळूहळू चुका कमी होत गेल्या आणि आत्मविश्वास वाढत गेला.
सुरवातीचे काही दिवस युकेगुडा नावाच्या ठिकाणी मुक्काम केला. नवीन आलेल्या माणसांसाठी काही दिवस राहण्याची या ठिकाणी सोय केली जायची. काही दिवसांनंतर रूम खाली करण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा एकदा मोठं संकट उभं राहील्यासारखं वाटलं. कारण ओळखीचं कोणी नाही, यावेळी सचिन फुलपगारे नामक प्राणी उगवला आणि त्याने मदतीचा हात पुढे केला. घरी रहायला बोलावण्यापासून, सामान घरापर्यंत नेईपर्यंत आणि नंतर आयुष्यातले अनेक बरेवाईट प्रसंग शेअर करण्यापर्यंत याने मनापासून मला मदत केली. (योगायोगाने आमची जन्मतारीख सारखीच आहे). दिलसुखनगर भागात असलेल्या या घरामध्ये आशिष चांदोरकर, सचिन देशपांडे, अमित जोशी सचिन आणि मी इतके जण रहायचो. पण घरी एकत्र भेटल्याचे प्रसंग बोटावर मोजण्याएवढेच होते. कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शिफ्ट असायच्या.
सगळ्यात भयानक असायची नाईट शिफ्ट पहाटे इतकी भयंकर झोप यायची , पण कामावर झोपणं म्हणजे कमी पणाचं लक्षण असं मनात भरवलं गेल्यानं झोपणं म्हणजे पाप असं म्हणत डोळे उघडे ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत काम करायचो. आमच्यानंतर आलेली पोरं गाद्या गिरद्या, अंथरूण पांघरूण घेऊन बिनधास्त झोपायची. आणि आम्ही ईमानदारीचं च्युईंगम चघळत स्वतलाच दोष देत बसायचो. पण आज त्या पोरांकडे पाहताना हे प्रकर्षाने जाणवतं की त्यांच्यात आणि माझ्यात काही ना काही तरी फरक आहे. पाट्या टाकण्यापेक्षा स्वतच नाव व्हावं ही ईच्छा कदाचित ईमानदारीच्या च्युईंगममुळे काही अंशी पूर्ण झालीय.
होय, मला आठवतंय. एकदा ई टिव्हीच्या ऑफिस बाहेर आम्ही चहा पीत होतो. श्रीरंग म्हणाला अरे त्या शेखर फडकेपर स्टोरी होऊ शकते का ? मी म्हटलं होतं नाही. अरे त्या शेखर फडकेला कोण ओळखतं. श्रीरंग - अरे पण नवीन कलाकार म्हणून करता येऊ शकते ना. श्रीरंग खरतर स्टोरी शोधत होता. नवीन असताना असेच छोटे छोटे विषय स्टोरीसाठी आपण शोधत असतो. पण आता सुमारे सात वर्षानंतर पुन्हा श्रीरंग बरोबर काम करताना त्याला स्टोरी शोधण्याची गरज लागत नाही. कोर्टात त्यानं चांगला जम बसवलाय आणि राजकिय बातम्यामध्ये ही. आता त्याच्याकडे बातम्याच बातम्या असतात. काही अंशी नव्हे तर इमानदारीच्या च्युईंगममुळे त्याचं बरंच नाव झालंय.
ReplyDelete