Skip to main content

अचानक आलेली समृद्धी आणि हरवलेला विरोध




मुंबई ते नागपूर सुपर वेगवान समृद्धी महामार्ग बांधण्याचं स्वप्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघितलं आहे. या मार्गाची घोषणा होताच विरोधाचे सूर उमटायला लागले. मात्र दिवस उलटत गेले तसतसा विरोधाचा गोंधळ शांत होत गेला. हा गोंधळ का शांत होत गेला हे आजपर्यंत कोणालाच कळालं नाहीये. मला याबाबत भयंकर उत्सुकता होती की अचानक हा विरोध क्षीण कसाकाय झाला, या उत्सुकतेपोटी मी काही माहिती जमा केली जी अत्यंत धक्कादायक आहे. 



मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेमुळे राज्यातील अनेकांचे जीवन बदलले, असा महामार्ग त्याकाळी अख्ख्या देशात नव्हता. आजही या एक्सप्रेसवेचं प्रचंड कौतुक केलं जातं. असाच महामार्ग नागपूरला जोडण्यासाठी बनावा असं स्वप्न मूळचे नागपूरचे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी बघितलं आहे. त्यासाठी त्यांनी प्रचंड धडपड केली आहे. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचाच या जिद्दीने ते काम करतायत. खरं सांगायचं तर हा प्रकल्प रेटून नेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. 

महामार्गासाठी सगळ्यात अवघड, जिकिरीचं आणि खर्चिक काम असतं ते भूसंपादनाचे. वर्षानुवर्ष कसलेली,किंवा राहतं घर असलेली जमीन सरकारला कशी द्यायची असा प्रश्न पडणं शेतकऱ्याला किंवा घरमालकाला पडणं स्वाभाविक आहे. त्यात ज्या जमिनी जाणार होता, त्या कसदार जमिनी होत्या. खासकरून ठाण्यातील, नाशिकमधील बहुसंख्य शेतकऱ्यांनी या जमीन संपादनाला विरोध केला होता. या महामार्गाबाबत राज्य सरकारने म्हटलंय की

दळणवळणाच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तरच तिथे तशी क्षमता निर्माण होऊ शकते. या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची कल्पनाच अशी आहे की यात रस्ते आणि पायाभूत सुविधांचं एक जाळं राज्याच्या १० जिल्ह्यात उभं रहाणार आहे आणि त्यांना लागून असलेले १४ जिल्हे हे वेगवान रस्त्यांनी जोडले जाणार आहेत, जेणेकरून विकासाची प्रक्रिया तिथेही सुरू होईल. या बरोबरच या महामार्गाच्या सभोवती काही नव-शहरे, म्हणजेच कृषी समृद्धी केंद्रंही विकसित करण्याचं नियोजन आहे.- महाराष्ट्र सरकार


७०० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग २६ तालुके ३९२ गावं यांना जोडणारा असेल. या महामार्गासाठी ६ हजार कोटींचा अवाढव्य खर्च येणार असून हा महामार्ग पूर्ण करण्याचं उद्दीष्ट्य ऑक्टोबर २०१९ हे ठेवण्यात आलं आहे. सुरुवातीच्या विरोधानंतर या महामार्गासाठी जमीन संपादनाचं काम अत्यंत वेगाने सुरू झालं आहे. या जमीन संपादनाच्या कहाण्या मोठ्या रंजक आहेत. 


या महामार्गासाठी जिरायती जमिनीला एकरी ५० लाख रुपये दर शासनाने निश्चित केला आहे. बागायती जमिनींसाठी दुप्पट म्हणजे जवळपास एकरी १ कोटी रूपये दर निश्चित केला आहे. अत्यंत आकर्षक भाव देऊनही अनेक गावांमध्ये या प्रकल्पाला विरोध होत होता. या गावकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी एक युक्ती काढण्यात आली. प्रत्येक गावामध्ये यंत्रणांनी कमजोर माणूस शोधून काढला जो या आर्थिक लाभाच्या आमिषाला बळी पडेल आणि रक्कम स्वीकारेल. अशी माणसं शोधल्यानंतर त्यांच्यासोबत बैठका करून करार करण्यात आले. ज्या दिवशी जमीन देण्यास होकार देत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्या, त्याच दिवशी या व्यक्तीच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली. एका रात्रीत या सगळ्या व्यक्ती करोडपती बनल्या. अचानक आलेल्या पैशामुळे ही मंडळी अक्षरश: वेडे झाले. ताबडतोब बंगले बांधायला सुरूवात झाली, आणि आलिशान गाड्या रोख रक्कम देऊन खरेदी करायला सुरूवात झाली. कालपर्यंत आपल्यासोबत विरोधात सामील असलेला हा माणूस श्रीमंत कसा झाला याच्या गप्पा गावभर सुरु झाल्या. विरोध करणारे शेतकरी या गर्भश्रीमंत झालेल्या गावकऱ्याशी येऊन चर्चा करायला लागले. पैसे एका रात्रीत खात्यात जमा होतायत हे कळाल्यानंतर अनेक शेतकरी सरकारशी बोलणी करायला तयार झाले. हळूहळू विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आणि जमीन देण्यास तयार होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली. या सगळ्यांना बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे. ही रक्कम कोणाकडून देण्यात आली, कोणाच्या मंजुरीने देण्यात आली हे मात्र गुप्त ठेवण्यात आलं आहे. यावरून येणाऱ्या काळामध्ये या महामार्गासाठी झालेला मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.


फडणवीस सरकारने ब्रिटीशांनी जे धोरण वापरलं तेच फोडा आणि झोडा धोरण वापरलं. ज्यांना शक्य होतं त्यांना पैसे देऊन फोडलं आणि ज्यांनी विरोध केला त्यांना लाठीचार्जमध्ये फोडून काढलं. या महामार्गासाठीचे भूसंपादन जमीनधारकांच्या संमतीने केल्यामुळे विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून ९३ टक्के जमीन ताब्यातही आली आहे अशी माहिती स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. डिसेंबरपर्यंत संपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन वर्षभरात महामार्ग तयार होईल असा सरकारने दावा केला आहे. २०१९ च्या निवडणुकांमध्ये हेच भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेत आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकेल. सत्ताबदल झाला तर मात्र अजस्त्र खर्च करून, जमीन हातात येऊनही हा प्रकल्प रेंगाळण्याची दाट शक्यता आहे.        

Comments

Popular posts from this blog

शाळा (भाग2)

आमची शाळा मध्यमवर्गीयांची होती, यातही बरेच विद्यार्थी असे होते ज्यांचे पालक जीवतोड मेहनत करून मिळेल त्यातल्या पैशातून कसंही करून मुलाला शिकवायचंच या जिद्दीने मुलांना शिकवणारे होते. अशा मुलांना अगदी नाममात्र म्हणजे 5 किंवा 10 रूपये फी पण परवडायची नाही त्यांच्याकडून सहलीसाठी पैसे कुठून मागायचे हा पण एक मोठा प्रश्नच होता. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फारसा कोणी प्रयत्नच केला नाही. जवळपास दिड वर्षापूर्वी शाळेत आमच्याबरोबर असलेले जे-जे जमतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. एकमेकांची विचारपूस करत असताना प्रत्येकजण आता काय करतोय हे कळत होतं. दहावीपर्यंत नुसता उंडगत फिरणारा आनंद संचेती आता इंजनिअर झाला, फॉरेनला गेला, नापास झाल्होयामुळे आमच्या बरोबर आलेला आणि नंतर आमच्याच बरोबरचा झालेला अमित कदम स्व : तचं दुकान चालवतो (आणि ते ही अतिशय उत्तम पद्धतीने) सायन्स करून कॉलेजमधून बाहेर पडलेला निलेश पाटील केमिकल चा प्लॅन्ट एकट्याच्या जीवावर उभा करू शकतो. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त रस असलेला प्रीतम परब एक मल्टीनॅशनल बँकेत मोठ्या पदावर आहे. जयेश जोशी स्वतची इव्हेन्ट मॅनेज...

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...