Skip to main content

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

 

मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही.


हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट  खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कदाचित त्या काळामध्ये पृथ्वीवर आलेले अत्यंत ताकदवान परग्रहवासी असू शकतात ज्याला स्वत:च्या शरिराबद्दलही फारसं काही माहिती नव्हतं अशा माणसाला आजच्या काळातील अतिप्रगत मानणाऱ्या मानवालाही शक्य होणार नाहीत अशा गोष्टी करणं कसं काय शक्य झालं ? 


इजिप्तमधले पिरामिड हे त्यातलं एक महत्वाचं उदाहरण म्हणून सांगता येईल. दगडाचे इतके मोठे तुकडे चौकोनी आकारात तेही एक समान आकाराचे कसे काय कापता आले? ते एकावर एक त्रिकोणी आकारात कसे काय ठेवता आले? त्या काळातील मानवाला न शिकवताही त्याने या गोष्टी आत्मसात कशा केल्या ? असे प्रश्न विचारले जातात. इजिप्तमध्ये त्या काळात रेखाटण्यात आलेल्या कलाकृतींमध्ये धड प्राण्याचं आणि शरीर मानवाचं असलेले विचित्र आकार सर्रास बघायला मिळतात. डोक्याभोवती तेजोवलय असलेले आणि या विचित्र प्राण्यापुढे नतमस्तक झालेले त्याकाळचे मानवही रेखाटण्यात आले आहेत. कदाचित ती त्या काळातील देवता असावी मात्र अनेक तर्कवाद्यांच्या मते हा प्राणी परग्रहावासी असावा ज्याच्या अफाट ज्ञानापुढे आणि त्याच्याकडे असलेल्या अतिप्रगत तंत्रज्ञानामुळे सगळे मानव त्यापुढे नतमस्तक झाले असावेत. पिरामिडच्या निर्मितीमध्ये परग्रहवासीयांनीच मदत केली असावी असा दाट संशयही ही तर्कवादी वर्तवतात, अन्यथा एवढं अचूक आणि आखीव रेखीव काम त्या काळच्या माणसाला जमणं अशक्य होतं.इजिप्तमध्येच सिंहाचे शरीर असलेली आणि महिलेचे तोंड असलेली अतिभव्य स्फिंक्सची कलाकृती भर वाळवंटात पाहायला मिळते. गुहांमध्ये ओबडधोबड चित्र काढणाऱ्या त्या काळच्या मानवाला इतकी भव्य कलाकृती उभारण्याची बुद्धीमत्ता होती? हा प्रश्न सतत मनात डोकावत राहतो.

या तर्कवाद्यांच्या यादीमध्ये सुरेश नाडकर्णीदेखील आहेत. त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहलं आहे की इराकमधील मोसूल शहराजवळच्या एका टेकडीवर गुहा सापडली होती. या गुहेमध्ये एक गणित कोरण्यात आलं होतं, गणिताचं उत्तरंही कोरण्यात आलेलं आहे. ते उत्तर होतं १९५,९५५,२००,०००,०००.  कार्बन डेटींगचा वापर करून या गणिताचा काळ हा चाळीस हजार वर्षांपूर्वीचा असावा असं पुस्तकात लिहलं आहे. विचार करा, आजही आपल्याला गणित सोडवायला कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटरचा वापर करावा लागतो, मग त्या काळातील माणसाला हे गणित कसं सोडवता आलं?   

नाईल नदीजवळ अबु सिंबेल या शहराजवळ रॅमिरेज या दुसऱ्या फॅरोने दोन मंदिरे उभारली होती. त्यातील एका मंदिरात ६५ फुटांपेक्षा उंच असे एकूण  दगडी पुतळे उभारले होते. हे त्या काळच्या माणसाला क्रेन, अत्याधुनिक हत्यारे-अवजारे यांच्याशिवाय कसं शक्य झालं असेल? हे पुतळे इतके अजस्त्र आणि वजनी होते की युनेस्कोला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरूनही जागचे हलवता आले नव्हते. अखेर या पुतळ्यांचे चार तुकडे करावे लागले तेव्हा कुठे ते हलवता आले.

नाडकर्णी यांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९३ साली प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर परग्रहवासी पृथ्वीवर आले होते का? आले असतील तर ते परत का गेले ? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा बराच प्रयत्न झाला आहे. त्यांचं संशोधन ऐकताना, वाचताना मती गुंग होत राहते. पुराणामध्ये सातत्याने येणारा विमानाचा उल्लेख, रामायण, महाभारतामध्ये अण्वस्त्रासारखी वर्णन असली अतिसंहारक अस्त्रे,हनुमानाला उडता येणे या गोष्टी पुन्हा विचार करून ताडून पहाव्याश्या वाटतात. तर्कवाद्यांनी तर्क मांडत त्यांचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केल्याने ही अंधश्रद्धा नाही हे तर स्पष्ट आहे. मग तर्काच्या कसोटीवर आपले देव हे देखील परग्रहवासी असतील का असा विचार डोक्यात येतो आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही खरंच सृष्टीनियंते आहात की परग्रहवासी असा प्रश्न पडत रहातो.

Comments

Popular posts from this blog

एका बादलीनं जग बदलेल

                                आत्तापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती ती म्हणजे पाण्याचं संकट हे दरवर्षी मोठं बनत जाणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येतायत, भविष्यातही हे प्रयोग होत राहतील. जलशिवार योजना असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी आपलं नाव अमर व्हावं यासाठी पृथ्वी बंधारे बांधण्याची सुरू केलेली योजना असेल, प्रयत्न सुरू आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर कोणतीही योजना यशस्वी होऊच शकत नाही. मग काय करायचं ?   हातावर हात धरून मांडी घालून पाणी समस्या किती भीषण आहे हो अशी चर्चा करत बसायची ? ज्यांना काहीच करायचं नाही ते काहीच करणार नाही, पण ज्यांना खरोखर काहीतरी करायचंय ते नक्की करू शकतील. वारकरी संप्रदायानं कुटुंब कबिला असणारा-यांना आध्यात्म कळू शकतं, आणि देवापर्यंत पोचता येऊ शकतं हा मार्ग दाखवून दिला. चळवळीच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. काही चळवळ दरवेळी रस्त्यावर उतरून करायला लागते असं नाही, करायची असेल तर ती कशीही करता येते...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...