Skip to main content

प्रेक्षकांवर बलात्कार करणारी ‘ झी’ मराठी


 

रोजच्या कंटाळवाण्या जगात मनोरंजन म्हणून मालिका हा त्यांच्यावरचा हमखास उतारा, असं काहीसं चित्रं गेल्या काही वर्षांत तयार झालं आहे. पण, मनोरंजनाच्या नावाखाली तुम्ही प्रेक्षकांचा अंत पाहू लागलात, तर काही दिवसांतच झीचा सचिन पिळगावकर होऊ शकण्याचे चान्सेस वाढायला लागले आहेत. याची मुख्य कारणं दोन, एक म्हणजे संहिता आणि त्यांच्या निर्बुद्धाने लिहिल्या असाव्यात अशा वाटणाऱ्या पटकथा. आणि दोन.. सध्या झीचे मालिका सोडून मार्केटिंगचे बरेच काही इतर उद्योग सुरू आहेत, त्यामुळे स्पर्धेत ही वाहिनी आता मागे पडत चालली आहे.


९०च्या दशकात जेव्हा केबलचं प्रस्थ वाढायला लागलं तेव्हा प्रादेशिक भाषांमधील चॅनल्स यायला लागले. त्यात मराठी भाषेतही आले. तारा, प्रभात, ईटीव्ही, मी मराठी आणि तेव्हाचं अल्फा (आताचं झी) मराठी. ही त्यातल्या त्यात प्रमुख नावं. त्यातलं झी हे नाव वगळता उरलेली सगळी नावं आता गुजरा जमाना झालीयेत. सुरुवातीलाच हे संदर्भ द्यायचं कारण म्हणजे झी मराठी या उरलेल्या चॅनलचा प्रेक्षकांवरचा वाढत चाललेला अत्याचार. मनोरंजनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते दाखवण्याचा चंगच झीने बांधलेला आहे.एकेकाळी याच वाहिनीने श्रीयुत गंगाधर टिपरे, व्यक्ती आणि वल्ली, घडलंय बिघडलंय, वादळवाट, पिंपळपान, प्रपंच अशा काही दर्जेदार मालिका दिल्यात हे आज सांगून पटणारही नाही, इतका झीचा दर्जा घसरत चालला आहे. कथांच्या नावाखाली काय वाट्टेल ते प्रेक्षकांच्या माथी मारण्याची स्पर्धा लावली तर त्यातही झी अव्वल येईल. बरं हे सगळं हळुहळू होत गेलेलं आहे. त्यामुळे उत्तम संहिता असलेल्या मालिकांनाही झीने म्हणावा तसा न्याय दिलेला नाही. आणि आता तर इतर वाहिन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झीने चक्क Factsची मोडतोड सुरू केली आहे. 


सध्या सुरू असलेल्या मालिका याचं उत्तम उदाहरण आहेत. त्यात पहिली येते ती लागिरं झालं जी ही मालिका. लय असत्यात मनमौजी, लाखात एक माझा फौजी अशी टॅग(!)लाईन घेऊन ही मालिका सुरू झाली होती. पण, त्यातली फौजी बनण्याची एकूणच प्रोसेस अत्यंत बाळबोध होती, हे कुणीही सांगू शकेल. नंतर येते ती तुझ्यात जीव रंगला. या मालिकेबाबत काय बोलावं.. एक सुशिक्षित बाई आडदांड आणि तितक्याच अडाणी माणसाच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करते. या मालिकेत एकाहून एक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. उदा. पुरुषाचा कौमार्यभंग कसा करावा, आपल्याला मूल हवं की नाही याचा निर्णय गावाला विचारून कसा घ्यावा, परक्या माणसाचं मूल कोणतंही कायदेशीर दत्तकपत्रं न पूर्ण करता घरी कसं सांभाळायला ठेवावं, घरातील राजकारण न समजता बाहेर मंत्री म्हणून कसं मिरवावं.. याचं प्रशिक्षण हवं असेल तर ही मालिका अवश्य बघायला हवी. 

त्याच्या पुढची मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको.. ही मालिका म्हणजे तर कहर आहे. नवऱ्याची लफडी कळल्यानंतर त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला सोडण्यापेक्षा आमची नायिका काय करते, तर मसाले कुटते.. मसाले कुटून कुटून ती मोठ्ठी उद्योजिका बनते. एवढी मोठी की, करोडोंची उलाढाल असलेल्या नवऱ्याच्या कंपनीला विकत घेते... काय राव थट्टा लावलीये का.. आज प्रत्यक्षात कितीतरी लघुउद्योग असतील, जे भांडवलाशिवाय चालेनासे झालेत. आणि अवघ्या काही महिन्यात फक्त मसाले कुटून ही बाई कोटींची कंपनी विकत घेते.. प्रेक्षक मूर्ख आहे हे गृहित धरून मालिका पाडायची म्हटली की हे असंच होणार. 

त्याच्या पुढची मालिका.. देवीयों और सज्जनों.. दिल थामके बैठिये.. आता येताहेत.. दोन रुपये कमी करून कोटींचा फायदा करण्याचा अशक्य कोटीतला पराक्रम करणारे आणि आपल्याहून निम्म्या वयाच्या मुलीच्या प्रेमात (धपकन) पडणारे कोट्यधीश.. विक्रांत सरंजामे आणि पाटीवर खर्रकन पेन्सिल ओढावी तशा आवाजात बोलणारी नायिका, तिचे ते भयानक भाबडे आईबाबा, मनोरुग्ण वाटावा असा भावी नवरा.. या मालिकेचा तर सगळाच उजेड आहे. त्याच्या पुढची छत्रपती संभाजी महाराजांवरची मालिका म्हणजे आणखी भयंकर.. 

संभाजी महाराजांच्या चरित्रातले अनेक प्रसंग वादग्रस्त आहेत. वाद टाळावा म्हणून मालिकेत इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे आणि अद्याप त्यावर कुणीही आक्षेप घेतलेला नाहीये, हे विशेष! त्याच्या पुढच्या मालिकांचं तर नावच नको.. मध्येच चला हवा येऊ द्याची गाडी परदेशवारीच्या निमित्ताने रस्ता चुकली होती. ती आता कुठे वळणावर येतेय. त्यातल्या त्यात गाव गाता गजाली ही बघण्यासारखी मालिका आहे. बाकी मालिकांचा तसा आनंदच आहे. सध्याचा जमाना वेबसिरीजचा आहे. त्यामुळे रटाळ मालिकांसाठी आता प्रेक्षकांना एक चांगला पर्याय मिळायला लागला आहे. 

रोजची कामं करत टीव्ही बघणारा भाबडा महिला वर्ग सोडला तर तरुण आणि प्रौढांना आता झीचा कंटाळा येऊ लागला आहे. कारण, एकेकाळी याच वाहिनीने दर्जा म्हणजे काय, याचा वस्तुपाठ घालून दिला होता. सरळ साधी सोपी कथानकं, तगडे कलाकार आणि टीआरपीचं लफडं नसल्याने मोजक्या एपिसोड्समध्ये आटोपणारी पटकथेची मांडणी यांमुळे प्रेक्षकांच्या मनात झीने घर केलं होतं. आताही जो प्रेक्षकवर्ग झी मराठी बघतो, तो याच मालिकांची पुण्याई आहे. पण, या पुण्याईत भर घालण्याऐवजी झी लोकांची लग्न जुळवण्यात, न चालणारी साप्ताहिकं काढण्यात मग्न झालेलं आहे. त्यामुळे आता इतर उद्योग नको, पण मालिका आवर, असं प्रेक्षक झी मराठीला ओरडून सांगताना दिसताहेत..


Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...