Skip to main content

महाराष्ट्रातील मोहंजोदाडो आणि हडप्पा


 

भारतात इतिहास हा फक्त पुस्तकात अभ्यासण्यासाठी निर्माण झालेली गोष्ट आहे असं बहुसंख्य मंडळींना वाटतं. परदेशात ज्या पद्धतीने इतिहासाकडे बघितलं जातं, त्यावर संशोधन केलं जातं त्यानुसार उत्खनन केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चर्चा केली जाते ते आपल्या देशात फारसं बघायला मिळत नाही. मोगल साम्राज्य, शिवाजी महाराज आणि त्यानंतर थेट देशाचा स्वातंत्र्य इतिहास हेच शाळेपासून कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांना लक्षात राहतील असे इतिहासातील भाग आहेत. सिंध संस्कृती, गुप्त, सातवाहन, मौर्य, चालुक्य राज्यकाळ हे कोणाला फारसं आठवत नाही. सातवाहन साम्राज्याचं ऐश्वर्य दाखवणारं आणि थेट रोमशी व्यापारी संबंध असलेलं महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यामधलं तेर गाव पाहण्यासाठी विदेशातील मंडळी येऊन जातात मात्र आपल्या राज्यातील बहुसंख्य लोकांना हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या किती महत्वाचं आहे याची पुसटशीही कल्पना नाहीये. 


महाराष्ट्र इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतीतीभोवती सातत्याने फिरत आला आहे. या महान राजाचं कर्तृत्वच तसं होतं. मात्र या लोक कल्याणकारी राजाच्या आधी महाराष्ट्रात नेमकं काय घडत होतं, हे राज्य कोणाच्याही अधिपत्याखाली नव्हतं का ? असा प्रश्न कोणालाच पडत नाही. उस्मानाबादपासून साधारणपणे २० किलोमीटर अंतरावर असलेलं तेर गाव राज्यातील बहुसंख्य लोकांनी ऐकलं नसेल. मात्र राज्यासाठी हे गाव तितकंच महत्वाचं आहे जितकं जगासाठी मोहंजोदाडो आणि हडप्पा. या गावात पावलोपावली इतिहास शंतपणे पहुडलेला मिळत राहतो. तुम्ही म्हणाल की इतिहास का काय माणूस किंवा वस्तू आहे का जी गावात शिरल्याशिरल्या पहुडलेला मिळेल. मी हे जाणीवपूर्वक म्हणतोय कारण या गावामध्ये पुराणकाळातील अनेक वस्तू भूगर्भात दडलेल्या आहेत. त्यातल्या निम्याहून कमी मिळाल्या आहेत, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या मिळायच्या बाकी आहेत. हे गाव सातवाहन राज्यकर्त्यांच्या वैभवशाली साम्रज्याची कहाणी सांगणारा छोटा पण महत्वाचा दुवा आहे. 

सम्रट अशोकाने बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर देशात बरीच उलथापालथ सुरू झाली होती. मौर्य घराण्याची ताकद कमकुवत व्हायला लागली होती आणि सातवाहन घराण्याचा उदय सुरू झाला होता. गौतमीपुत्र सत्कर्णी हा या वंशाचा सगळ्यात नावाजलेला आणि पराक्रमी राजा होता, ज्याने सातवाहन साम्राज्य बरंच विस्तारलं. सातवहन घराणं हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या सध्याच्या राज्यांमध्ये विस्तारत गेलं होतं. दक्षिण मध्य भारताचा बराचसा भूभाग या सातवाहन घराण्याने व्यापला होता. तेर हे याच सातवाहन काळातील एक शहर होतं. या शहराचं वैशिष्ट्य हे आहे की या शहराचा व्यापार थेट ग्रीक आणि रोमन साम्राज्यापर्यंत होत होता. इथलं तलम सूती वस्त्राला प्रचंड मागणी होती.  व्यापारासाठी देशांतर्गत व्यवस्था चांगली असल्याशिवाय  ग्रीक आणि रोमपर्यंत व्यापार केवळ अशक्य होता. त्यामुळे तेरपासून नालासोपारा किंवा त्याकाळच्या बॅरीगाझा आणि सध्याच्या भरूचपर्यंत रस्त्याच्या मार्गाने माल नेण्यासाठी चांगली व्यवस्था असावी असा अंदाज आहे. त्यापुढे सगळा व्यापार समुद्रीमार्गाने चालत असे. ग्रीक भूगोलतज्ज्ञ टॉलेमी याने तेगारा (तेर) हे महाराष्ट्रातील जुने आणि महत्वाचे व्यापारी शहर आहेअसं म्हटल्याचा उल्लेख आहे. पेरीप्लस ऑफ द एरीथ्राईन सी या पुस्तकामध्ये लिहलंय की इसापूर्वी पहिल्या शतकामध्ये भारताच्या पश्चिमी भागातील तेर आणि त्याकाळचं प्रतिष्ठान  ज्याला आपण आज पैठण म्हणतो ही दोन महत्वाची शहरं होती. 

तेरचा उल्लेख करायचा आणि रामलिंगप्पा लामतुरे यांचा उल्लेख करायचा नाही हे म्हणजे देवळात जाऊन देवाला नमस्कार न करता बाहेर येण्यासारखं आहे. किराणामाल विकणाऱ्या रामलिंगप्पा यांना स्वत:च्या गावच्या इतिहासाबद्दल प्रचंड अभिमान होता. इतिहासावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी गावात मिळणारे ऐतिहासिक अवशेष जमा करायला सुरुवात केली. गावकऱ्यांनीही आपल्या घरी अडगळ कशाला असं म्हणत मिळेल ते अवशेष लामतुरे यांना द्यायला सुरुवात केली. असं करता करता आजमितीला लामतुरे संग्रहालयात २५ हजारांपेक्षा जास्त अवशेष जमा झाले आहेत. जर लामतुरे नसते तर हे अवशेष आपल्याला कधीत पाहायला मिळाले नसते. रोमन साम्राज्य आणि तेरमधील व्यापारावर झगझगीत प्रकाश टाकणारे अनेक अवशेष यामध्ये आपल्याला सापडतील. लामतुरे संग्रहालयामध्ये मातीच्या वस्तू, मातीच्या भांड्यांचे तुकडे, मणी, दगडांच्या मूर्ती, शाडूच्या मुर्ती, हस्तिदंती वस्तू, सातवाहन काळातील नाणी आणि त्यांचे साचे अशा वस्तू पाहायला मिळतात. 

तेरमध्ये काही महिन्यांपूर्वी तांदूळ आणि मूग एकत्र असलेलं मातीचं भांडं सापडलं होतं. यावरून संशोधकांनी कयास बांधला आहे की इसापूर्व काळापासून मानवाला खिचडी कशी बनवायची हे ठाऊक होते. ज्याअर्थी तेर भागात तांदूळ खाल्ला जात होता, त्या अर्थी इथे पूर्वी प्रचंड पाऊस पडत असावा आणि इथे तांदुळाची शेती केली जात असावी. इतका समृद्ध इतिहास आपल्या राज्यात असतानाही अनेकांना तो माहिती नसणं हे अत्यंत खेदजनक आहे. तो लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ना राज्य सरकार काही करतंय ना केंद्र सरकार. पाश्चिमात्य देशांमध्ये अशा अवशेषांची किंमत ही पैशात न मोजता येण्यासारखी असते. इतिहास समजून घेण्यासाठी हे अवशेष महत्वाचा दुवा आहे असं ते मानतात, जी अत्यंत खरी गोष्ट आहे. पण ही गोष्ट आपल्याला केव्हा समजणार ?

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...

एका बादलीनं जग बदलेल

                                आत्तापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती ती म्हणजे पाण्याचं संकट हे दरवर्षी मोठं बनत जाणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येतायत, भविष्यातही हे प्रयोग होत राहतील. जलशिवार योजना असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी आपलं नाव अमर व्हावं यासाठी पृथ्वी बंधारे बांधण्याची सुरू केलेली योजना असेल, प्रयत्न सुरू आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर कोणतीही योजना यशस्वी होऊच शकत नाही. मग काय करायचं ?   हातावर हात धरून मांडी घालून पाणी समस्या किती भीषण आहे हो अशी चर्चा करत बसायची ? ज्यांना काहीच करायचं नाही ते काहीच करणार नाही, पण ज्यांना खरोखर काहीतरी करायचंय ते नक्की करू शकतील. वारकरी संप्रदायानं कुटुंब कबिला असणारा-यांना आध्यात्म कळू शकतं, आणि देवापर्यंत पोचता येऊ शकतं हा मार्ग दाखवून दिला. चळवळीच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. काही चळवळ दरवेळी रस्त्यावर उतरून करायला लागते असं नाही, करायची असेल तर ती कशीही करता येते...