जी घटना घडलीच नाही किंवा जी घटना लोकांच्या फक्त कल्पनेत आहे ती घटना अडीच तासांच्या चित्रपटात बसवणं हे जवळपास अशक्य काम आहे. हे अशक्य काम रिडली स्कॉट नावाच्या अत्यंत गुणी दिग्दर्शकाने करून दाखवलं आहे. कल्पना 'दृश्यांच्या' आधारे मांडण्याचा काम हे रिडले स्कॉटचं होतं मात्र ते वठवण्याचं काम हे रसेल क्रोचं होतं. चित्रपट संपल्यानंतर चित्रपटात भूमिका करणारा रसेल क्रो हा खरोखर मॅक्सिमस डेसिमस मेरिडियसच आहे असं बराच वेळ वाटत राहतं. या दोघांनी जे काही काम केलंय त्याला तोडच नाहीये, ज्यामुळे मी आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्वांगसुंदर चित्रपटांपैकी ग्लॅडीएटर हा पहिल्या क्रमांकाचा चित्रपट आहे.
![]() |
| मार्कस ओरेलिअसचा पुतळा |
रोमन साम्राज्याच्या इतिहासामध्ये लोकशाही मूल्ये जपणारी माणसं कशी होती याच्या
गर्वितगाथा सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. ग्लॅडीएटर हा खरा तर त्याच धाडणीचं कथानक असलेला चित्रपट आहे. ग्लॅडीएटर चित्रपट जेव्हा आला तेव्हा आणि
त्यानंतर सातत्याने चित्रपटाच्या कथेबद्दल वाद निर्माण झाले. इतिहासात
डोकावणाऱ्या बहुतांश चित्रपटांवरून देशात आणि विदेशात बराच वाद झाला आहे. चित्रपटात खऱ्या घटना मोडून तोडून दाखवण्यात आल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे. मात्र टीका करणाऱ्यांचं हे म्हणणं देखील आहे की ज्या घटना खऱ्या
आहेत, त्या चित्रपटात ज्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत त्या खऱ्या घटना बघतोय
असा भास होईल इतपत प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.
![]() |
| हर्क्युलिसच्या वेशातील कॉमोडस |
चित्रपट हा रोमन साम्राज्य, फंदफितुरी, राजाचा सत्तालोलुप मुलगा आणि प्रतिकूल
परिस्थितीशी लढत स्वत:च्या आणि
रोमन साम्राज्यातील जनतेच्या हालअपेष्टा संपवणारा योद्धा-लढवय्या ग्लॅडीएटर या
कथानकावर आधारीत आहे. रिचर्ड हॅरीस याने मार्कस ओरेलिअसची भूमिका साकारली आहे.
काही दृश्यांपुरता तो दिसला असला तरी चित्रपटात ‘ मार्कस
ओरेलिएस द वाईज’ या
नावाने त्याचा सातत्याने होणारा उल्लेख प्रेक्षकांना
तो स्वत:ला विसरू देत नाही. जोकीम फिनिक्सने चित्रपटात
त्याच्या मुलाची म्हणजेच कॉमोडसची भूमिका साकारली आहे आणि ग्लॅडीएटर म्हणजेच
मॅक्झिमसची भूमिका ही रसेल क्रोने साकारली आहे. युद्धभूमीवर असलेला आणि प्रचंड
थकलेला मार्क ओरेलिअस याला आपला मृत्यू जवळ आलेला दिसत असतो. तो मनापासून ठरवतो की
त्याच्यानंतर त्याचे राज्य मुलाला चालवायला देणं हे जनतेसाठी धोकादायक ठरू शकेल.
ज्यामुळे तो मॅक्झिमसला उत्तराधिकारी नेमण्याचं मनोमन ठरवतो. मात्र त्याने आदेश
देण्यापूर्वी ही बाब तो स्पष्टपणे कॉमोडसला सांगतो, ज्यामुळे संतापलेला आणि मनातून
दुखावलेला कॉमोडस त्याला ठार मारतो. राजाला मारल्यानंतर तो मॅक्झिमसच्या बायकोला
आणि मुलाला क्रूरपणे हालहाल करून ठार मारण्याचे आदेश देतो. मॅक्झिमसलाही मारण्याचे
तो आदेश देतो, मात्र मॅक्झिमस कसाबसा सुटतो आणि ग्लॅडीएटर्सना शिकवणाऱ्या आणि झुंझीसाठी
ग्लॅडीएटर्स पुरवणाऱ्या एका प्रोक्सिमोला सापडतो. मॅक्सिमस मेला असा समज झालेला
कॉमोडस रोममध्ये परततो आणि मनमानी पद्धतीने काम करायला सुरूवात करतो. लोकांना अन्न
देण्याऐवजी तो त्यांना ग्लॅडीएटर्सच्या झुंजींची मेजवानी देण्याचं ठरवतो, सिनेट
सदस्यांना न जुमानता तो हे अंमलातही आणतो. भावाच्या खूनशी वृत्तीची माहिती असलेली
त्याची बहिण सिनेट सदस्यांच्या मदतीने कॉमोडसचा खून करण्याचं ठरवते, मात्र योग्य
माणूस मिळत नसल्याने कट अर्धवट सोडून दिला जातो. रोममधल्या झुंजींची माहिती
मिळताच, प्रोक्सिमो आणि मॅक्सिमस रोममध्ये
येतात. मॅक्सिमसला हाताशी धरून ल्युसिलिआ (कॉमोडसची बहीण) कॉमोडसला ठार
मारण्यात यशस्वी होते अशी चित्रपटाची कथा दाखवण्यात आली आहे.
इतिहास पडद्यावर दाखवणं हे अत्यंत कठीण काम असतं ज्यामुळे तो दाखवण्याची
हिम्मत अनेकजण करत नाहीत. रिडले स्कॉटने मात्र प्रयोग करायला न घाबरणारा दिग्दर्शक
आहे. त्याने इतिहासकालीन मात्र वेगवेगळ्या कालखंडातील चित्रपट बनवले आहेत. ज्यात
ग्लॅडीएटर व्यतिरिक्त रॉबिनहूड, एक्झोडस गॉडस अँड किंग, किंगडम ऑफ हेवन सारख्या
चित्रपटांचा समावेश आहे. रिडले स्कॉट हा रसेल क्रोच्या प्रचंड प्रेमात आहे. ग्लॅडीएटर
चित्रपट हा रसेल क्रोने लोकांना लक्षात ठेवण्यासाठी भाग पाडला इतकं उत्तम काम केलं
आहे. न्यूझीलंडचे क्रिकेटपटू जेफ आणि मार्टीन क्रो यांचा चुलत भाऊ असलेल्या रसेल क्रो
हा देखणा, राजबिंडा वैगरे अजिबात नाहीये. आपल्या मर्यादा त्याला चांगल्या पद्धतीने
माहिती आहेत. युद्धभूमीवर घरी जाण्याच्या कल्पनेनेच आनंदलेला, खुरटलेली दाढी
वाढलेला, जखमांमुळे थकलेला, दु:ख
मनात दाबून ग्लॅडीएटर बनलेला आणि स्वर्गात बायको मुलाला भेटणार या कल्पनेने डोळे
कायमचे मिटणारा रसेल क्रो देहबोलीतून बोलतोच शिवाय त्याचे डोळेही सतत हे सगळे भाव
व्यक्त करत असतात. यामुळेच रसेल क्रो हा रिडले स्कॉटला अत्यंत आवडणारा अभिनेता
आहे. रसेल क्रो सोबत रिडले स्कॉट याने एकूण ५ चित्रपट केले आहेत. आणि प्रत्येक
चित्रपट हा एकमेकांपासून वेगळा आहे.
ग्लॅडीएटरमध्ये चित्रीकरणासाठीची स्थळं, दृश्यांमधून होणारी
रंगांची उधळण, ग्राफीक्सचा उत्तम वापर, पार्श्वसंगीत हे सगळं प्रभावीपणे वापरण्यात
आलं आहे, आणि ते चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारं आहे. या सगळ्या
गोष्टींमुळे हा चित्रपट सर्वांगसुंदर आहे असं मी नेहेमी सांगत असतो.






Comments
Post a Comment