नेटफ्लिक्सने मनोरंजनाचा प्रचंड मोठा खजिना सगळ्यांसमोर ओतून ठेवलाय. त्यातून
काय वाट्टेल ते उचला आणि पाहा असं नेटफ्लिक्सचं म्हणणं आहे. पण तो खजिना इतका
प्रचंड आहे की काय पाहायचं हे शोधण्यातच अनेक दिवस जातात. रिअल रॉब ही अशीच शोधता
शोधता अपघाताने सापडलेली सिरीज आहे. रॉब श्नायडर हा असंख्य हॉलीवूडपटांमध्ये काम
केलेला विनोदी अभिनेता आहे. ही सिरीज त्याचीच आणि आणि त्याच्यासाठीच आहे. पोट
दुखून वाकडेतिकडे होईपर्यंत रॉब तुम्हाला हसवत राहतो. त्याच्यासाठी ही सिरीज एकदा
पाहिलीच पाहिजे असा माझा आग्रह आहे.
हॉलीवूडमध्ये एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे अभिनेते आहेत (प्रेम करणारे याचा
अर्थ ते गे आहेत असा नाही) अॅडम सँडलर आणि रॉब श्नायडर हे त्यातले दोन महत्वाचे कलाकार आहेत. अॅडम सँडलरचा कोणताही
चित्रपट तुम्ही काढून बघा तुम्हाला रॉब श्नायडर एका फ्रेमपुरता का होईना शंभर
टक्के दिसणार म्हणजे दिसणारच. मैत्रीमुळे कठीण काळात मदत केल्याची परतफेड म्हणून अॅडम
त्याच्या प्रत्येक चित्रपटात रॉब श्नायडरला हमखास घेतोच घेतो. रॉब श्नायडर हा तसा
बघायला गेला तर हँडसम अभिनेता नाही, फक्त विनोदाच्या जोरावर त्याने स्वत:चं स्थान तयार केलंय.
काही चित्रपटांमध्ये
त्याने मुख्य भूमिकाही केल्या आहेत. बरीच वर्ष मोठ्या पडद्यावर काम केल्यानंतर
त्याने मोर्चा वेबसिरीजकडे वळवला. खरी परिस्थिती आणि थोडा ड्रामा यांचा मिलाफ करत
त्याने स्वत:च्या आयुष्यावरच ही सिरीज काढलीय. या सिरीजमध्ये
त्याचं खरं कुटुंब दाखवण्यात आलं.म्हणजे त्याची बायको पॅट्रीशिया आणि अवघ्या काही
महिन्यांची मुलगी मिरांडा या मालिकेत रॉबची बायको आणि मुलगी म्हणूनच दाखवण्यात
आल्या आहेत. रॉबचं वय आज ५४ वर्ष झालं आहे. वेबसिरीजमध्ये त्याला म्हातारा होत
चालल्याने नवे चित्रपट मिळणं कठीण होत जातंय. ते मिळवण्यासाठी तो वाट्टेल ती धडपड
करतोय असं दाखवण्यात आलं आहे. वास्तविक
आयुष्यातही रॉबची हीच धडपड सुरू आहे, जी त्याने फार हसतखेळत लोकांपर्यंत पोहचवली
आहे.
या संपूर्ण मालिकेमध्ये फार थोडी पात्र दाखवण्यात आली आहे. म्हणजे १० ते १२
पात्रांच्या आधारे रॉबने ही संपूर्ण मालिका बनवली आहे. रॉबची सुंदर बायको, ती
सुंदर असल्याने आणि रॉब म्हातारा होत चालल्याने तिचं पुरुषांसोबत बोलताना होणारा
संताप. घरात फक्त अंडरवेअरवर फिरणारे पुरुष बघितल्यानंतर रॉबने केलेला थयथयाट आणि
त्यानंतर त्याच्या बायकोने ते गे अससल्याचं सांगितल्यानंतर होणारं तोंड हे प्रसंग
अफलातून घेण्यात आले आहेत.
या सिरीजमध्ये जीव आणणारी आणखी दोन पात्रं आहेत ती
म्हणजे रॉबचा असिस्टंट जेमी जो एकही काम धड करत नसतो आणि दुसरा म्हणजे रॉबचा
सावलीसारखा पाठलाग करणारा गूढ माणूस ज्याला हल्ली स्टॉकर म्हणतात तो स्टीव्ह. पगार
देऊनही नीट काम न करणारा जेमी जी कामं करत नाही ती सगळी कामं स्टीव्ह फुकट करत
असतो, उदाहरणार्थ रॉबला आवडणारी विचित्र ज्युस तयार करणे, कोणाला किती वाजता
भेटायला जायचे यादी व्यवस्थित नोंद ठेवणे वैगरे वैगरे. संपूर्ण मालिका खरंतर याच चार पात्रांभोवती फिरत
असते. अधूनमधून पाहुणे कलाकार येऊन जाऊन असतात जे मालिका अजून मजेशीर बनवत जातात.
बायका कोणाच्याही असोत त्या कशा नवऱ्यांना कामाला लावतात, झाडतात आणि
मनाप्रमाणे वाकवतात हे रॉबने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बायकोला घाबरणारा रॉब नको
ते उपद्व्याप करायला जातो आणि बायकोच्या शिव्या खातो हे ठसठशीतपणे दाखवण्याचा
प्रयत्न केलाय. हात धुवून न आल्याने अंगाला हात लावून न देणारी, विविध कारणं देत
सेक्सला नकार देणारी बायको पॅट्रिशियाने मस्त रंगवली आहे. नवऱ्याला मनाजोगतं काम
मिळत नसल्याने पॅट्रिशिया बिझनेस सुरू करते आणि त्यात तिला रॉबपेक्षाही जास्त पैसे
मिळायला सुरुवात होते ज्यामुळे रॉबचा पुरुषी अहंकार दुखावला जातो, पण आपण तोंड
उघडलं तर आपल्या अंगाशी येईल हे कळाल्यानं तो गप्प बसतो.
![]() | |
| रॉबच्या पाठीमागे सावलीसारखा फिरणारा स्टॉकर |
आत्तापर्यंत या मालिकेचे दोन भाग आले आहेत. दोही भागात रॉबने जबरदस्त हसवलं आहे.
मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे रॉब काही भागांची सुरूवात स्टँडअप कॉमेडिअन म्हणून लोकांना
“ आमच्या घरी ना आज असं झालं” अशा थाटात सांगतो आणि मग भागाला सुरूवात होते अशी करण्यात आली आहे. जो एक
वेगळा प्रयोग आहे आणि तो खूप मस्त जमलाय.




Comments
Post a Comment