Skip to main content

घर बसल्या गुप्तहेर बनविणारे फेसबुक


काही दिवसांपूर्वी व्हॉटसअपवर एक मेजेस आला होता. पूर्वी मूलभूत गरजा या तीन होत्या अन्न, वस्त्र आणि निवारा. या मूलभूत गरजा आता पाच झाल्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा व्हॉटसअप आणि फेसबुक. टाईमपाससाठीचं हे साधन आता लोकांच्या उपयोगी पडू लागलंय. मात्र याचे दुष्परिणाम हे न दिसणारे आहेत. मी फेसबुक वापरतो, त्यामुळे ते पूर्णपणे वापरणं थांबवा असं सांगण्याचा मला नैतिक अधिकार नाही. फेसबुक कसं वापरायला पाहीजे हे मात्र मी नक्की सांगू शकेन.

काही महिन्यांपूर्वी मी ठाण्यावरून पुण्याला जात होतो. प्रवासामध्ये माझ्या शेजारी बसलेल्या प्रवाशाची बस थांबली तेव्हा ओळख झाली. मी मराठीला अँकरींग करताना त्यांनी पाहीलं होतं. बोलण्याच्या ओघात कळालं की त्यांचं नाव स्वप्नील शिंदे असं होतं. बंगळुरूमध्ये एका अत्यंत मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ते फारच मोठ्या पदावर कामाला आहेत. असं असूनही माणूस एकदम साधा आणि मनमोकळा होता. बोलताना त्यांनी मला माहिती नसलेल्या मुद्दावर बोलायला सुरूवात केली. फेसबुकवरून ठेवली जाणारी पाळत असा त्यांचा विषय होता. भलत्याच इंटरेस्टींग पद्धतीने त्यांनी सांगायला सुरूवात केली. त्यांचा एका ओळखीतल्या मुलाला अचानक धमक्या यायला लागल्या होत्या. मुलगा खूप घाबरला आणि विचित्र वागायला लागला. हा प्रकार त्याच्या आईने शिंदेंना सांगितला, त्यांनी या मुलाची फेसबुक टाईमलाईन बघितल्यानंतर त्यांना खरा प्रकार लक्षात आला. एका कॉमेंटमुळे काही धर्मांध मुसलमानांनी या शाळकरी मुलाला धमक्या दिल्या होत्या.

शिंदे यांच्या बोलण्यातून एक गोष्ट कळाली ती म्हणजे की तुम्ही आभासी जगात अजिबात सुरक्षित नाही. जितके तुम्ही फेसबुकच्या अधीन जाल तेवढे तुम्ही उघडे नागडे होत जाल. डेटा चोरी प्रकरणी मधल्या काळात मोठा गहजब झाला होता. तुमच्या आवडीनिवडी फेसबुक गुपचूपपणे संकलित करून ठेवत असते. या आवडीनिवडी काही कंपन्यांना विकण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये अमेरिकेतील राजकीय पक्षही सामील होते. यानंतर बऱ्याच सुरक्षा उपाययोजना केल्याचा दावा फेसबुकने केलाय. मात्र तरीही तुम्ही सुरक्षित नाही.

फेसबुकवर आपण सहजपणे Travelling to Singapore असा मॅप शेअर करून मोकळे होतो, सिंगापूरला निघालेल्या सगळ्या मंडळींचे एअऱपोर्टवरचे फोटो काढून लगेच अपलोड करतो. बास्स मी चोराला इतकी माहिती पुरेशी आहे. तुम्ही घरी नाही आणि पुढचे २-३ दिवस तरी येणार नाही हे कळतं. मग घरी येईपर्यंत तुमचं घर साफ झालेलं असतं.


मध्य प्रदेशात एका तरुणीची हत्या झाली. हत्या करणारा तिचा लहानपणीचा मित्र होता ज्याने फेसबुकवरून तिचा पत्ता शोधून काढला होता, फेसबुकवरूनच त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती, ज्याला तिने नकार दिल्याने त्याने तिचा खून केला.


नोयडामध्ये एका महिलेला ती फेसबुकवरून चॅट करत असलेल्या माणसाने फुलांचा बुके आणि केक पाठवला. सुरुवातीला या महिलेशी आरोपी सभ्यपणे बोलत होता नंतर त्याने अश्लील संभाषण करायला सुरूवात केली होती


हैद्राबादमध्ये एका तरुणाने त्याच्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे फेसबुकवरून फोटो डाऊनलोड केले आणि SEX साठी मला कॉल करा असे मेसेज टाकून तिचा नंबर व्हायरल केला.


फेसबुकने त्यांच्याच एका सुरक्षा अभियंत्याला साठवून ठेवलेली ठेवलेली माहिती मिळवत शेकडो महिलांना अश्लील संदेश पाठवले होते.


फेसबुकवर तुम्ही जे काही मांडता त्यातून तुमची आवड, तुमचा कल, विचारसरणी, खासगी गोष्टी फोटो, व्हिडीओ अशा हजारो गोष्टी जगभरातील लाखों लोकांना सहजपणे कळू शकतात. याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, त्यामुळे फेसबुक वापरताना लिमिटमध्ये राहा. काही लोकांना सवय असते सकाळी उठल्यापासून मी दात घासतोय/घासतेय पासून आता रात्री मी झोपतो/झोपते इथपर्यंत सगळे मेसेज टाकण्याची. ही सवय त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. फेसबुक हे फोटो अपलोड करण्यासाठी अत्यंत धोकादायक ठिकाण आहे. हे फोटो मॉर्फींग करून अश्लील फोटो बनवले जाण्याची दाट शक्यता असते. हे प्रकार टाळले तर सुरक्षित आणि सुखी समाधानी जीवन जगण्याचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो.

Comments

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या...

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यां...