मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र फिरलोय. राज्यात पडलेला दुष्काळ खासकरून जवळून बघितला, त्यावरून झालेलं राजकारणही बघितलं. या दुष्काळाच्या काळात एक बातमी ही आजही मला चांगल्या पद्धतीने लक्षात आहे. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या शहापूरपासून जवळच एक डेंगणमाळ नावाचं गाव आहे. या गावातील महिला टकल्या व्हायला लागल्या होत्या. केस जाण्यामागचं मुख्य कारण होतं ते पाण्याचं दुर्भिक्ष. ही बातमी करायला गेलो असताना मला भलतीच बातमी सापडली.
डेंगणनमाळ अत्यंत गरीब आणि आदिवासी गाव आहे. मुंबई ठाण्यासारखी शहरं जवळ असूनही हे गाव काही सुधारलेलं नाही. या गावातील महिला टकल्या व्हायला सुरुवात झाल्याचं कळालं. गावात गेलो. विचारलं की काय होतंय, कशामुळे या महिलांचे केस जायला लागले? यावर त्या महिला म्हणाल्या की आमचा अख्खा दिवस पाणी आणण्यात जातो. एखा खेपेत जमेल तेवढं पाणी आणायचा प्रयत्न असतो. हंडा जड असतो, डोक्यावर घेऊन चालत येताना केस ओढले जातात आणि मुळापासून तुटतात, हे गेलेल केस काही परत येत नाही, परिणाम असा की टक्कल पडायला लागलं. महिलांशी बोलत असताना एक माणूस भेटला, त्याच्याशी बोलत असताना तो म्हणाला की या गावात पाण्यासाठी जाम वणवण करावी लागते. घरातल्या सगळ्या बायका दिवसभर पाणी भरण्याचंच काम करतात. काहींनी तर पाणी भरण्यासाठी ४-५ लग्नही केली आहेत. मला भयंकर आश्चर्य वाटलं, मी त्यांना विचारलं, तुमच्या कोणी ओळखीचं आहे का ? त्यावर त्याने होय म्हणून मान हलवली आणि माझ्यामागे या असं म्हणून गावातल्या पायवाटेने चालायला सुरुवात केली.मला ज्या घरात नेण्यात आलं ते दादू भगत होतं, त्यावेळी त्यांचं वय जवळपास ५९-६० च्या घरात होतं. त्यांनी थोडंसं लाजत लाजतच एक फोटो दाखवला त्यांच्यासोबत तीन महिला उभ्या होत्या ज्या त्यांच्या पत्नी होत्या. असं का? इतकी लग्न कशासाठी? असे दोन-तीन प्रश्न गोळीसारखे तोंडातून निघून गेले. मान खाली घालून ते म्हणाले की पहिली बायको जेव्हा गर्भवती होती, तेव्हा घरात पाणी भरण्यासाठी कोणी राहिलं नाही. मी एकटा आणून आणून किती पाणी आणणार. डोक्यावरून पाणी आणण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीये, त्यामुळे मी दुसरं लग्न केलं. घरातील लोकांची संख्या वाढली तशी पाण्याची गरजही वाढली म्हणून तिसरं लग्न केलं. दुपारी उन्हाचा कडाका असल्याने पाणी भरता येत नाही. जे पाणी भरायचं ते ऊन चढायच्या आत आणि दिवस मावळायच्या पहिले भरायला लागतं. त्यामुळे भगत यांच्या घरात पाणी भरायला दोन महिला शिफ्टनुसार काम करायच्या एक महिला चूल आणि मूल सांभाळायची. महिलेचा नवरा गेला तर विधवेशी पुन्हा विवाह करण्याची पद्धतीही आदिवासींमध्ये आहे, त्यामुळे पाण्यासाठी पुरुष या विधवा महिलांसोबत लग्न करायचे ही परिस्थिती बघितल्यानंतर मला द्रौपदीची आठवण आली. महाभारतातील द्रौपदीने पांडवांसोबत संसार केला होता. इथल्या महिलांनीही परिस्थितीमुळे द्रौपदीत्व स्वीकारलं आणि एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत लग्न केलं.
ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. भातसा धरण या गावापासून जवळच आहे, तरीही गावांना पाणी मिळत नाही. नळपाणी योजना आणणं तर दूरच राहीलं या पाड्यांना टँकरनेही पाणी पुरवठा केला जात नव्हता. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी या पाड्यांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेस युतीचं सरकार सत्तेत असतानाही ते इथले आमदार होते. जलसंपदा खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असूनही या गावांसाठी, पाड्यांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली नव्हती. ती फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर करण्यात आली होती. जर या सरकारला ते शक्य झालं तर ते मागच्या सरकारला का शक्य झालं नाही हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. गेल्या सरकारने हे काम केलं असतं तर त्यांच्यात आमदारांचं नाव झालं असतं. डेंगणमाळमधला फक्त पाण्याचा प्रश्न सुटला नसता तर एकापेक्षा जास्त लग्न करण्याची प्रथाही बंद झाली असती. दुष्काळ हा फक्त पाण्याची समस्याच घेऊन येत नाही, तर त्यासोबत असंख्य संकट आणि अडचणी घेऊन येतो हे डेंगणमाळने दखवून दिलं.
Comments
Post a Comment