युट्यूब आणि फेसबुकवर बी युनिक (BeYouNick) नावाचा चॅनेल चालवला जातोय. निकुंज लोटिया आणि तुषार खेर यांनी त्यांच्या साथीदारांना सोबत घेऊन उभा केलेला तो चॅनेल आहे. हा चॅनेल ख...त...र...ना...क हिट झालाय.पडद्यावर जेवढी हे दोघे धमाल करतात तेवढीच त्यांच्या चॅनेलची कहाणीही धमाल आहे.
मुंबई आणि उपनगरातील मंडळी उपहासाने डोंबिवलीला गाव म्हणतात, मी जिथे मिळेल तिथे त्याला ठोकून काढत डोंबिवली हे गाव नाही ते शहर आहे हे सांगत असतो. ठाणे आणि डोंबिवली ही दोन शहरं पत्रकारांची खाण आहे, अत्यंत नावाजलेली पत्रकार मंडळी, संपादक हे डोंबिवलीतून आले आहेत हे अनेकांना माहिती नाहीये. असो, हा विषय थोडा बाजूला ठेवूया आणि Be YouNick बद्दल बोलूयात. डोंबिवलीसारख्या शहरातील दोन तरुणांनी एकत्र येऊन एक युट्युब चॅनेल सुरू केला आणि तो इतका हिट झाला की आज या दोघांंचं आणि त्यांच्या चॅनेलचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे.
निकुंज हा पूर्वी फ्रीलांस बारटेंडर म्हणून काम करत होता, तर तुषार खेर हा इंजिनिअर म्हणून सिमेन्ससारख्या कंपनीत काम करणारा होता. एका जिममध्ये या दोघांची भेट झाली असं दोघांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. या चॅनेलसाठी तुषार दुबईतील नोकरी सोडून परत भारतात आला आहे. यांच्या एपिसोडमध्ये साधारणपणे हेच दोघे मुख्य भूमिकेत असतात. हे युट्युब चॅनेल हिट होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे व्हिडीओतील विषय. निकुंज आणि तुषारने सांगितलं की आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वावरताना, घरात, ऑफीसमध्ये किंवा कुठेही जे चांगलं दिसतं, ज्यातून विनोदनिर्मिती होऊ शकते असे विषय आम्ही निवडतो. अचकट-विचकट, अंगविक्षेप किंवा वेडीवाकडी तोंडं करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अश्लील विनोद या सिरीजमध्ये कुठेही दिसत नाही. सेन्सॉरचं बंधन नसल्यानं ए.आय.बी सारखी अत्यंत शिवराळ भाषणा वापरणारी, सगळे नॉनव्हेज जोक असलेली सिरीज युट्यूबवर उपलब्ध आहे. मात्र बी युनिकमध्ये असली गोष्ट कुठेही दिसत नाही, हे या सिरीजचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. साधारणपणे ३ वर्षांपूर्वी हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान सामना होणार होता. या सामन्यासाठी मौका मौका नावाची एक जाहिरात तयार करण्यात आली होती, त्याची पॅरोडी म्हणजे विनोदी जाहिरात निकुंज आणि तुषारने तयार केली होती. तिचे युट्यूबवरील व्ह्यूज हे मौका मौकाच्या जाहिरातीपेक्षा जास्त झाले होते असं या दोघांनी सांगितलं आहे.
इप्मिरिअल ब्ल्यू या दारूच्या ब्रँडने मेन विल बी मेन नावाची एक जाहिरातींची मालिका काढली होती, ही मालिका तुफान गाजली होती. यातल्या एका जाहिरातीमध्ये सुमीत राघवनही होता. निकुंज आणि तुषारने त्याचीही पॅरोडी तयार केली होती, जी देखील अत्यंत गाजली होती.
पॅरोडी लोकांना आवडतेय कळाल्यानंतर त्यांनी नार्कोसमधल्या पाब्लो एस्कोबारचीही पॅरोडी काढली होती. हे सगळं मुंबईवाल्यांच्या दृष्टीने असलेल्या गावाकडेच म्हणजेच डोंबिवलीत होत होतं आणि त्याची दखल सगळं जग घेत होतं. असा दावा केला जातो, की निकुंज लोटिया हा आता युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दर महिना दहा लाख रूपये कमावतो, या दाव्याला आजपर्यंत कोणीही पुष्टी दिलेली नाही. आकड्याबाबत उलटसुलट दावे केले जाऊ शकतात, मात्र निकुंज आणि त्याची टीम ही या चॅनेलच्या माध्यमातून तगडी कमाई करायला लागली आहे. मुरली तेवर नावाचा त्यांचा मित्र आणि सिरीजमधला कलाकार आहे, त्याने शिक्षण सोडून दिलंय.
या टीमने जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांना शूट कसं करायचं यातलं ओ का ठो कळत नव्हतं मात्र विनोद चांगला असला तर तो लोकांपर्यंत पोहोचतोच आणि त्यांना आवडतोच हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. पहिला व्हिडिओ शूट करत असताना ट्रायपॉडची उंची वाढवता येते हे निकुंजला माहितीच नव्हतं, उंचावरून दृश्यं टिपण्यासाठी तो फ्रीजवर जाऊन बसला होता. सुरुवातीला या टीमचा भर छोटे व्हिडीओ म्हणजे ३० ते ४० सेकंदांचे व्हिडीओ बनवण्याकडे कल होता तो आता बदलून या टीमने थोडे मोठे व्हिडीओ बनवणं सुरू केलं आहे.
हल्ली मोठ्या कलाकारांनाही वेबसिरीजचं आकर्षण वाटायला लागलं आहे. निकुंज आणि त्याच्या टीमला या माध्यमाचं महत्व फार पूर्वीच कळालं होतं. ज्यामळे आज ते स्टार झाले आहेत. निकुंजने हसत हसत सांगितलं की आम्ही इतके फेमस झालोय की एकदा चुकून तिकीटाशिवाय प्रवास करत असताना टीसीने पकडलं, मात्र टीसीने मला ओळखल्याने त्याने मला जाऊ दिलं, एका वडापाववाल्याने देखील मला ओळखलं. ‘गावाकडची’ मंडळी फेमस होऊ लागली आहे, हे मुंबईकरांनी थोडं लक्षात घ्यायला हवं असं माझं या निमित्ताने म्हणणं आहे. गावाकडच्या या सुपरस्टार्सना कडक डॅब सेलिब्रेशन सॅल्यूट
this is called as ' Dab Celebration' |
Comments
Post a Comment