मला आदिवासी समाजाबद्दल प्रचंड कुतूहल वाटत आलंय. देशाच्या कोणत्याही भागात जा, तुम्हाला विविध आदिवासी जमाती सापडतील. अगदी काँक्रीटचे जंगल असलेल्या मुंबईतही आदिवासी आहेत. काँक्रीटचे जंगल विरूद्ध खरे जंगल या संघर्षात सातत्याने चेपला गेलेला ,शहराशी आणि शहरातील मानवी श्वापदांशी बुजून वागणारा आदिवासी समाज हा त्याच्या रितीरिवाजांसाठी ओळखला जाणारा आहे. ‘जल,जमीन,जंगल’ याला सर्वस्व मानणाऱ्या आदिवासी समाजामध्ये एसी सरकार नावाची संकल्पना सुरू झाली होती, मात्र आज ती फक्त आदिवासींनाच माहिती आहे, शहरी भागातील लोकांना आणि प्रसारमाध्यमांना त्याची पुसटशीही कल्पना नाही.
'न्यू' इज 'न्यूज' किंवा NORTH,
EAST,SOUTH,WEST म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घटना म्हणजे न्यूज असं
समीकरण आजही पक्कं डोक्यात बसलेलं आहे. असं असूनही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या या
व्याख्येत, परिमाणात बसूनही दिसत नाहीत किंवा दाखवल्या जात नाही. एसी सरकार ही
त्यातलीच एक गोष्ट आहे. 2014 च्या निवडणुका कव्हर करायला गेलो असताना नंदूरबारमध्ये माझा
मित्र भिकेश पाटील याने सर्वात पहिल्यांदा एसी सरकारबद्दल सांगितलं. विषय एवढा
फॅनस्टॅस्टीक होता की निवडणुकीचं काम थोड्यावेळ बाजूला ठेवून मी ते ऐकत बसलो होतो.
एसी सरकार म्हणजेच एन्टे ख्राईस्ट (AC)
म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीपासून अस्तित्वात असलेले सरकार. मी आधी
म्हटल्यापूर्वी भूमीपुत्र कोण यावरून बराच वाद आहे, मात्र आदिवासी हे खरे
भुमिपुत्र आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. या
आदिवासींचंही तेच म्हणणं आहे की आम्ही ख्रिस्ताने जन्म घ्यायच्या आधीपासून इथे
आहोत, आणि इथे इतर कोणाचं नाही तर आमचं सरकार आहे. या भावनेतूनच एसी सरकार अशी
मोहीम सुरू करण्यात आली. केसरी सिंह हे या मोहीमेचे शिल्पकार असल्याचं सांगितलं
जातं. ही मोहीम आता त्यांचा मुलगा रवींद्र सिंह चालवतात. यांच्या कल्पना आणि विचार
शहरी भागातील वाचकांना खुळचटपणाच्या वाटतील मात्र ते मला जाम मस्त वाटल्या. या कल्पना,विचारांमागे त्यांचे
स्वत:चे तर्कही आहेत. त्यांचे विचार काय आहेत ते आधी आपण पाहूयात.
- आईवडील हे या समूहामध्ये देवाच्या जागी मानले जातात
- आईवडीलांना २ अंगठे छातीशी धरून नमस्कार करण्याची पद्धत आहे
- वंदन करण्यासाठी ‘ स्वकर्ता पितु की जय’ असं म्हटलं जातं
- समूहातील प्रत्येकजण नावापुढे एसी शब्द लावतात आणि त्यानंतर स्वत:चं नाव लावतात
- सरकारी एकही दस्तावेज या समूहातील लोकांना मान्य नाही, रेशन कार्ड-आधार कार्ड याला ही मंडळी मानत नाहीत
- शासकीय योजनांचा ही मंडळी कधीही लाभ घेत नाहीत
देशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी समाज विखुरलेला
आहे, मात्र एसी सरकार मानणारे आदिवासी हे प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य
प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यातील आहेत. एसी सरकारबाबतच्या कल्पना हास्यास्पद
वाटत असल्या तरी त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत ज्या आजपर्यंत स्वत:ला
पुढारवादी म्हणवणाऱ्या किंवा सुसंस्कृत समाजाला अंगीकारता आलेल्या नाहीत. या
गोष्टी कोणत्या आहेत त्यादेखील आपण पाहूयात
- एसी सरकार समूह जात,पात,धर्म,पंथ मानत नाही. या मंडळींसाठी एसी सरकार हेच सबकुछ आहे.
- ही मंडळी कर्ज घेण्याच्या सक्त विरोधात आहेत
- ही मंडळी स्वत:ची जमीन कधीही विकत नाही
- रुढीपरंपरा, कर्मकांड,रितीरिवाजही ही मंडळी मानत नाहीत
- हे लोक निसर्ग पूजक असतात त्यामुळे जंगलाच्या आणि वन्यजीवांचे रक्षण करणे त्यांची मुख्य जबाबदारी समजतात
- या आदिवासी समाजातील लोकांचा बाल विवाहाला विरोध आहे
- एसी सरकार समूह व्यसनांच्या सख्त विरोधात आहे, या समूहाने आदिवासी भागात व्यसनमुक्ती साठी मोठी चळवळ उभारली आहे.
ही मंडळी एक रुपयाच्या जुन्यानोटेला फार मानतात,
याचं कारण देखील आम्ही समजून घेतलं. या जुन्या नोटेवर भारत सरकार लिहलेलं आहे,
बाकी सगळ्या नोटांवर ‘ रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया केंद्र सरकारद्वारा
प्रत्याभूत’ असं लिहलेलं
आहे.
जुन्या नोटेवर कोणाचीही सही नाहीये, मात्र इतर सगळ्या नोटांवर
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. यामुळेच बाकी सगळ्या नोटा एसी सरकार मानत
नाही. एसी सरकार मानणाऱ्या आदिवासींचं दरवर्षी संमेलन आयोजित केलं जातं, मात्र
त्याची सिंगल कॉलम बातमी किंवा, एक फ्रेम व्हिज्युअल्सही कुठे दिसत नाही. अण्णा
अण्णा असं म्हणणारा (तसा आवाज अजिबात येत नसूनही) कोंबडा, ढगांचे
प्रकार, स्वर्गाची शिडी असल्या कुठल्याही विषयावर बातम्या होऊ शकतात मात्र एसी
सरकारची एकही बातमी होत नाही याचं आश्चर्य वाटतं. एसी सरकार काळानुरुप बदलेलं आहे,
नेत्यांकडे एक्सयूव्ही सारख्या गाड्या यायला लागलेल्या आहेत. हा पैसा कुठून आला,
समाज कसा पुढारला याची चौकशीही कोणी करायला तयार नाही. जी मंडळी लोकनियुक्त सरकार
मानत नाही, त्यांची निवडणुकीबाबत आता काय भूमिका आहे, नक्षलवादाच्या समस्येबद्दल
काय वाटतं हे देखील कोणाला विचारावंस वाटत नाही. हा समूह लोकांपुढे न येण्यामागे माध्यमं
हे महत्वाचं कारण आहे.
Comments
Post a Comment