सुधीर ढवळे |
शहरी नक्षलवाद, पुरोगामी, प्रतिगामी, डावे, उजवे अशी बरीच चर्चा सातत्याने सुरू असते. शहरी नक्षलवाद असा प्रकारच अस्तित्वात नाही असा बचाव डाव्या चळवळीतील काही मंडळींकडून सातत्याने ऐकायला मिळतो. पत्रकारिता करीत असताना मला जो अनुभव आला तो या मंडळींच्या दाव्यांच्या चिंधड्या उडविणारा होता.
ईटीव्ही मराठी साठी फिल्ड रिपोर्टींग करायला मला मुंबईला पाठवण्यात आलं. अत्यंत संवेदनशीलपणे पत्रकारिता करणारी वृत्तवाहिनी म्हणून त्याकाळी हे न्यूज चॅनेल ओळखलं जायचं. मुंबईचे ब्युरो चीफ राजेंद्र साठे यांचा आग्रह असायचा की लहानात लहान बातमीही कव्हर झाली पाहीजे. ईटीव्हीमध्ये आझाद मैदानावरील आंदोलने ही नियमितपणे कव्हर केली जात होती. अनेक आंदोलनं अशी असायची ज्यात आंदोलन करणारा एक माणूस आणि त्याच्यासमोर बूममाईक घेतलेला पत्रकार आणि कॅमेरामन असे फक्त तीनच जण मैदानात असायचे. बंदोबस्तावरील पोलीसही असल्या दृश्यांची मजा घ्यायचे. आता आझाद मैदानात मेट्रोचं काम सुरू झालंय, त्यामुळे आंदोलनं, उपोषणं पूर्वीसारखी होत नाही कारण त्यांना परवानगीच मिळत नाही. या आंदोलनांच्या कव्हरेज दरम्यान डाव्या चळवळीशी निगडीत अनेक मंडळी भेटायची, ज्यात एक होता सुधीर ढवळे
मी ईटीव्ही सोडून झी२४तास मार्गे स्टार माझाला गेलो. पुढचे जे प्रसंग घडले ते सगळे स्टारमाझाचे ड्राय रन सुरू असतानाचे आहेत. झी २४ला मी एक महिनाही काम केलं नाही, कारण तिथले सीमा गुप्ता आणि रविकांत मित्तल हे मराठी न समजणारे बॉस डोक्यावर आणून बसवले होते. मोठी स्टोरी द्यावी या विचारात असताना मला सुधीर ढवळेचा फोन आला होता.
सुधीर ढवळेने मला सांगितलं की भेटायचंय, जमेल का एक बातमी आहे. मी भेटूया म्हणालो आणि नंतर विसरून गेलो. त्याच्यानंतर ३-४ दिवसात मी तिथून बाहेर पडलो, पुढील फॉर्मॅलिटी जॉईनिंगच्या गडबडीमुळे ढवळेनी फोन केला होता हे मी विसरून गेलो होतो. ड्रायरन सुरू झाल्यानंतर चांगल्या स्टोरींवर काम सुरू झालं, तेव्हा मला ढवळेला फोन करायचाय हे लक्षात आलं. मी फोन केला आणि आमची भेट ठरली
सिद्धार्थ कॉलेजच्या समोरच्या गल्लीमध्ये याझदानी बेकरी आहे. लाकडाने पेटवलेल्या चुलीवर बनवलेल्या सगळ्या पदार्थांसाठी हे इराणी हॉटेल फेमस आहे. इथे बसलो आणि काही मिनिटात सुधीर ढवळे आला. दोन चहांची ऑर्डर दिली आणि नंतर सुधीर रिलॅक्स झाल्यासारखा बोलायला लागला. सुधीरने त्याच्या शबनम बॅगमधून एक लिफाफा काढून दिला आणि सांगितलं की ऑफीसला जाऊन बघ इथे नको. मी ठीक म्हटलं आणि सॅकमध्ये तो लिफाफा ठेवून दिला. ऑफिसला पोचलो आणि ते पार्सल काढलं. त्यात एक सीडी होती आणि चिठ्ठी होती. चिठ्ठी घाईघाईने वाचली, ती होती गणपती नावाच्या माणसाची. गणपती हा कुख्यात नक्षलवादी असून तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये. गणपतीने स्वत: चिठ्ठी लिहून त्याचा संदेश माझ्यापर्यंत पोहचवला होता. संदेशात नक्षलवाद्यांच्या कँपबद्दलची माहिती होती. ही चिठ्ठी बाजूला ठेवली आणि आयटीवाल्याला सीडी डाऊनलोड करून दे म्हणून सांगितलं कारण, तेव्हा सरसकट सगळ्या पीसींना सीडी प्ले करण्याची सिस्टम कंपनीतूनच बंद करण्यात आली होती. सीडी डाऊनलोड झाली आणि जेव्हा ती बघितली तेव्हा आश्चर्य वाटलं, सीडीमध्ये नक्षलवाद्यांचा एक कँप गडचिरोली जिल्ह्यातील एका दुर्गम भागात भरला होता, त्याचे ते व्हीज्युअल्स होते. या व्हीज्युअल्समध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नक्षलवाद्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यांच्या आठवणीनिमित्त एक स्तंभ उभारण्यात आला होता असा बऱ्याच गोष्टी त्यात होत्या. ड्राय रन असल्याने ही बातमी स्टार माझावर दिसली नाही, मात्र ती स्टार न्यूजने तेव्हा बरीच चालवली होती.
भीमा-कोरेगाव दंगलीनंतर देशभरात नक्षलसमर्थकांविरोधात कारवाई करण्यात आली, सुधीर ढवळे याला या प्रकरणी अटक करण्यात आली. ढवळेला यापूर्वीही याच आरोपांखाली अटक करण्यात आली होती, शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका झाली होती. या प्रकरणात सुधीर ढवळेला अटक झाल्यानंतर सीडीप्रकार मला पटकन क्लिक झाला. सुधीरवर तेव्हा जबाबदारी ही नक्षलवाद्यांच्या बातम्या पत्रकारांपर्यंत पोहचवण्याची होती. माझे आणि सुधीरचे बातमीसाठी सतत बोलाचाली व्हायची. इतरांसोबतही ती होत होती. कोणास ठाऊक का पण त्याने ही सीडी आणि प्रेस नोट फक्त मला दिली.
जंगलातील नक्षलवाद शहरातील लोकांना कळावा यासाठी सुधीरसारखी असंख्य माणसं आज शहरात काम करत आहेत. त्यातील बरेचसे वकील आहेत. ईटीव्हीत असताना एक तरुण भेटला होता, ज्याचं नाव सादीक बाशा होतं. डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनेचा तो नेता होता. सिद्दार्थ कॉलेज समोरच्याच एका इमारतीमध्ये त्याची भेट झाली होती. त्याने विनंती केल्याने त्याचं तोंड न दाखवता मी त्याचा बाईट घेतला होता, ज्यात त्याने नक्षलसमर्थक सामान्य नागरिकापासून उद्योगपतीपर्यंत असल्याचं सांगितलं होतं. तुम्ही त्यांना कधीच ओळखू शकणार नाही, पण ते आपल्यातला माणूस बरोबर ओळखून काढतील असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे शहरात नक्षलवाद कुठे आहे ? असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी हा ब्लॉग नक्की पाठवा.
Comments
Post a Comment