Skip to main content

जीवनदायी व्हॉटसअप योजना

व्हॉटसअप चांगलं का वाईट याबद्दल अनेकदा ऊलटसुलट चर्चा ऐकायला मिळते. वाईट गोष्टींबद्दल जास्तच जोरात चर्चा होते. तंत्रज्ञानाचा चांगला फायदा होऊ शकतो याचं एक उदाहरण म्हणून मी हा ब्लॉग लिहीतोय.

माझा शाळेतला मित्र आहे दत्तात्रय मेटकरी म्हणून, त्याचा फोन आला त्याच्या परिचयाच्या एका माणसाला माझ्याशी बोलायचं होतं, मी त्याला सांगितलं की फोन करायला सांग. संतोष शिंदे नावाच्या माणसाचा मला फोन आला. संतोषचं ६ दिवसांचं बाळ होतं ज्यावर अवघड आणि महागडी शस्त्रक्रिया करायची होती.  त्या बाळाला वाडीया हॉस्पीटलमध्ये आणलं होतं.  मला संतोष शिंदेनं सांगितलं की वाडीयावाले शस्त्रक्रिया करायला तयार नाही त्याला दुस-या हॉस्पीटलमध्ये न्यावं लागेल.

मला त्याने त्याच्या बाळाचा फोटो पाठवला होता. तो फोटो आणि व्हॉटसअपचा एक मेसेज तयार केला आणि अनेक ग्रुपमध्ये पोस्ट केला. या ग्रुप्समध्ये पत्रकार होते, मंत्र्यांचे पीए होते, राजकारणी अशी अनेक माणसं होतं. त्यातल्या काही जणांनी संतोषशी संपर्कही साधला. अमेय खोपकरचा मला मेसेज वाचल्यानंतर फोन आला हे खरं आहे का (कारण मदत करा असं सागून फसवणारे अनेक जण आहेत) मी म्हटलं ही केस खरी आहे.  त्यानं मला विचारलं मी काय करू ? मी म्हटलं की तुला पैश्यांची काही मदत करता आली तर प्लीज बघ. थोडावेळानं त्याचा मला फोन आला म्हणाा रंग्या मी अँम्ब्युलन्स घेऊन निघालोय आपण त्या बाळाला शिफ्ट करूया.

माझा ऑफीसमधला मित्र मनीष आंजर्लेकर पण मदत मिळावी यासाठी फोनफोनी करत होता. मी त्याला विनंती केली की मला काम आहे ऑफीसमध्ये तू प्लीज वाडीया ला जाशील का ? त्यासोबत अक्षय भाटकर पण स्टोरी करायला निघाला. मी सतत मनीष, अमेय आणि अक्षयला फोन करत होतो.  त्या बापावर आणि त्या बाळाच्या आईवर काय ओढवलं असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येत होता. पोटच्या मुलाला खरचटलं तरी आईबाप चिंतेत पडतात, इथे या दोघांच्यावर फक्त ६ दिवसांच्या बाळावर भली मोठी शस्त्रक्रिया करण्याची पाळी आली होती.

त्यातच या दोघांकडे पैसेही नव्हते, दुनिया इतकी हरामी असते, या मुलाच्या बापाला त्याच्या ओळखीच्या वकीलानं भेटायला बोलावलं आणि मदत करतो असं सांगून त्याला रस्त्यावर उभा करून ठेवलं होतं, मदतीसाठी हा लाचार झालेला बाप २-३ तास रस्त्यावरच उभा होता. या भडव्यांना फोडून काढायला हवं खरंतर, कारण मदत करायची नसेल तर करू नका पण कृपया असं आशेवर लावून कोणाला ताटकळत ठेवणं योग्य नाही.

अमेय आला त्यानं अँम्ब्युलन्,मधून मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पीटलमध्ये नेलं.  मला सिरीयसली आजही माहिती नाही की अमेयनं या सगळ्या उपचारादरम्यान किती खर्च केलाय. अमेय खोपकर, घरडा केमिकल्सचे निलेश कुलकर्णी, मनसेचे अभिजीत पानसे, नगरसेवक संतोष धुरी या सगळ्यांनी या उपचाराचा खर्च उचलायचं ठरवलं. या बाळाला जवळपास २० दिवस हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. या बाळाचं काय झालं असेल असा अनेकदा प्रश्न निर्माण व्हायचा. सतत त्याच्या वडीलांना फोन करणं योग्य वाटत नव्हतं. अमेयलाही कळत नव्हतं. हॉस्पीटलचा पी.आर बघणारा भास्कर तारे हा माझा चांगल्या परिचयाचा आहे. त्याच्याकडून जमेल तेव्हढी माहिती घेत होतो.

एक दिवस त्या बाळाच्या वडीलांचा फोन आला, त्यांनी सांगितलं ऑपरेशन झाल्यानंतर बाळाला दोन दिवस आय.सी.यू मध्येच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येईल आणि नंतर डिस्चार्ज मिळेल

खरंच सांगतो त्यावेळी इतकं बरं वाटलं की ते सांगता येणार नाही. बरीच टेन्शन असतात त्या सगळ्या टेन्शनपासून थोडावेळ मुक्तता मिळाली. कारण समाधान होतं एका छोट्याश्या बाळाला वाचवण्यात, एका कुटुंब पुन्हा सावरण्यात माझा थोडाफार का होईना हातभार लागला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी त्या बाळाला आणि बाळाच्या आईला दोघांना घरी जायला सांगून त्याच्या वडीलांना ऑफीसला बोलावलं. कारण मला या सगळ्या घटनेवर एक शो करायचा होता. माझी आणि संतोष शिंदे यांची ती पहिलीत भेट होती. संतोष सोबत डॉ.सुरेश जोशी ज्यांनी त्या बाळावर शस्त्रक्रिया केली होती, ते देखील आले होते. डॉक्टरांशी बोलताना त्यांनी सांगितलं की ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट होती कारण ह्रदयाला रक्त पुरवठा करणा-या शुद्ध रक्ताच्या आणि अशुद्ध रक्ताच्या वाहीन्या उलट सुलट झाल्या होत्या त्या  आपल्या मूळ जागी बसवण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती. कथेचा शेवट गोड झाला त्यामुळे आनंद आहे.

ही सगळी घटना आटवल्यानंतर व्हॉटसअपचा असाही वापर होऊ शकतो हे कळालं. तंत्रज्ञानाचा विजय असो...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या...

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यां...