वारी सुरू झालीय. स्टार माझामध्ये असताना दोन वर्ष वारी कव्हर केली. गेली दोन-तीन वर्ष काही जायला मिळालं नाही. ‘वारी’ हे दोन शब्द आजही ऐकले की नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. शून्य माहिती होती वारीबद्दल, पण वारी हा विषय असा आहे की तो पाठांतर आणि रिसर्च करण्यापेक्षा स्वत अनुभवून लोकांपर्यत पोचवणं जास्त सोपं असतं. अनेक लोकं स्वतला वारी स्पेशल तज्ञ म्हणवतात, पण वारीतला खरा तज्ञ असतो तो मैलो-न-मैल चालणारा वारकरी, जो कधीच काहीच बोलत नाही.
शहरात राहणा-या मंडळींचं वारीबद्दलचं ज्ञान म्हणजे खेडड्यातल्या गावंढळ लोकांची एक यात्रा एवढंच असतं. मात्र ही यात्रा नसून जीवन म्हणजे काय हे देहू-आळंदी ते पंढरपूर या प्रवासादरम्यान समजवून सांगणारा प्रवास असतो. वारी बदलत चालली आहे. शेतक-यांबरोबर हायप्रोफाईल लोकंही वारीत सहभागी होतात, अविनाश भोसले आपल्या लव्याजम्यासोबत वारीत चालतात, आय.टी.वाले , विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी वारीत जेवढं जमेल तेवढं अंतर पार करताना दिसतात. कित्येक विदेशी मंडळीही दिंड्या,पताका घेऊन चालताना दिसतात.
एरवी ज्यांच्याकडे लोकं पहातही नाही अशी मंडळी वारीतले हिरो असतात. प्रत्येक दिंडीमध्ये असणारे वीणेकरी, टाळ वाजवणारे, मृदंग वाजवणारे आणि अशा कित्येक जणांना दिंडीमध्ये अत्यंत मानाने वागवलं जातं. वारक-याला ,दिंडीला, वारीला शिस्त असते ती शिस्त कधीच मोडलेली बघायला मिळत नाही. जी लोकं भारतीयांच्या बेशिस्तीबद्दल शिव्या घालतात त्यांना खास या वारीमध्ये पंगतीत बसवून हिरव्या मिर्चीचा खर्डा आणि बंद झालेल्या नाकातूनही पाणी काढण्याची ताकद असलेली रस्सा भाजी खाऊ घालण्याची मला फार इच्छा आहे.
वारी कव्हर करताना असे प्रसंग बघितले की मी मूळापासून हादरलो होतो. मी माझा कॅमेरामन धीरज आणि त्याचा अटेंडंट संदीप गाडीतून जात असताना 100 पेक्षा जास्त वय असलेला एक म्हातारा भेटला, त्याला धड चालताही येत नव्हतं, डोळ्याने नीट दिसत नव्हतं, आणि ऐकायलाही येत नव्हतं. जमिनीवर बसून तो पंढरपूरच्या दिशेनं सरकत सरकत जात होता. आम्हाला दया आली त्याला गाडीत बसवला आणि पुढे निघालो. धीरज त्या म्हाता-याची मस्करी करण्याचा प्रयत्न करत होता. पण जेव्हा त्याने त्याची कहाणी सांगितली तेव्हा धीरज पण गप्प बसला. त्या म्हाता-या बाबाचं नाव आठवत नाही पण तो मूळचा अहमदनगरचा राहणारा होता. मुलाला त्याने सांगितलं वारीला जायचंय. मुलानं नकार दिला, तर हा म्हातारा (खिशात एक पैसाही नव्हता) पळून वारीला आला. त्याच्या घरच्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला की माहित नाही. आम्ही त्याला विचारलं तू बसून का चालतो तर त्याने पाय दाखवले (अनवाणीच चाललेला) पायाला फोड आलेले, चालल्याने ते फुटलेले आणि जखमा झालेल्या तरीही तो पंढरपूरला चाललेला. वारीत आपापल्या पद्धतीने सेवा करणारी अनेक मंडळी असतात. लोणी काळभोरचा एक तरूण डॉक्टर रतन काळभोर कोणत्याही वारक-याची मोफत सेवा करायचा. आम्ही त्याला फोन केला आणि त्या म्हाता-या बाबाला त्याच्यापर्यंत पोचवला. त्या म्हाता-याच्या चेह-यावर कुठेही दुख नव्हतं, कुठेही थकवा नव्हता(शरीरात थकवा होता कारण रतन काळभोर ने माझ्यामते त्याला सलाईन लावली होती) उपचार झाल्यानंतर तो म्हातारा परत गायब झाला. वारी संपताना पंढरपूरच्या जवळ तोच म्हातारा मला पुन्हा खुरडत सरकताना दिसला. आता या जिद्दीला आणि चिकाटीला काय म्हणाचं हेच मला कळत नव्हतं। माझ्यासारखा असता तर केव्हाच कोलमडून पडला असता आणि परत फिरला असता.यावेळी आम्ही त्या म्हाता-याला पुन्हा गाडी भरला आणि थेट पंढरपूरपर्यंत नेऊन पोचवलं.
Comments
Post a Comment