ईटीव्हीत जगणं सुसह्य करणा-या काही निवडक गोष्टी होत्या. त्यामध्ये खाणं ही सगळ्यात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट होती. हैद्राबादची ओळख ही तिथल्या बिर्याणी मुळे आहे. आम्ही ज्या ठिकाणी रहायचो (दिलसुखनगर भागात) तिथे वडापावच्या गाड्यांप्रमाणे बिर्याणीची छोटी दुकानं असायची. फक्त दिलसुखनगरच नाही तर जवळपास संपूर्ण हैद्राबादमध्ये अशा पद्धतीची दुकानं दिसून यायची. एका बिर्याणीमध्ये दोन जणांचं काम भागायचं. 70 ते 80 रूपयांमध्ये एका वेळचं पूर्ण जेवण बिर्याणीमुळे होऊन जायचं. अमित जोशीला फिरण्याची बरीच आवड होती. एकदा अमित एकटाच सिकंदराबाद भागात गेला होता तिथं “अल्फा” नावाच्या हॉटेलमधली बिर्याणी त्याला एवढी आवडली की दोन माणसांची बिर्याणी त्याने एक ब्रेक घेऊन संपवून टाकली. (बिर्याणी एका माणसानं संपवणं ही अशक्यप्राय गोष्ट होती) सांगायचं तात्पर्य की बिर्याणीची चव ही आयुष्यभर स्मरणात राहील अशी होती.
सकाळी नाश्त्यासाठी पुन्हा छोट्या दुकानांचा आधार घ्यावा लागयचा. रस्त्याच्या कडेला अनेक स्नॅक्स कॉर्नर दियायचे. इथे इडली, डोसा, पासून टॉमेटो भात बिसिबेळी हुळ्ळीअन्ना( मला या पदार्थाचं नाव ऐकूनच तो न खाण्याची इच्छा व्हायची) सगळं मिळायचं आणि ते ही फार कमी दरामध्ये (आमच्यासाठी हीच महत्वाची गोष्ट होती). या स्नॅक्स कॉर्नरव्यतिरिक्त आमच्या घरातून बाहेर पडल्यानंतर थोडं दूर एका मुसलमान चाचाचं हॉटेल होतं. बाहेरून दिसायला टिनपाट हॉटेल होतं मात्र इथं मिळणारी पुरी आणि बटाट्याची पातळ भाजी आणि चहा या दोन गोष्टी फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाच्या तोंडात मारेल अशा होत्या.
ऑफीसच्या परिसरात मात्र खाण्यापिण्याचा दुष्काळ होता. नाईच शिफ्टला जिन्यात येणारी ईडली आणि रात्री उशिरापर्यंत कॅन्टीमध्ये मिळणारे समोसे आणि पफ या दोन गोष्टींच्या जीवावर कित्येक ईटीव्हीयन्सनी दिवस काढले असतील. जे जेवण कॅन्टीनला मिळायचं ते देखील बघून न खाण्याची जास्त इच्छा व्हायची. सतत मिळणारा अर्धा कच्चा भात, सांबार आणि कुछकुठल्या भाज्या असे पदार्थ थाळीत असायचे.
आमच्या घरात प्रत्येक जण चवीनं खाणारा होता. आशिष चांदोरकर, सचिन फुलपगारे, मी राजेंद्र हुंजे या सगळ्या मंडळींनी गुढी पाडवा साजरा करायचं ठरवलं. गुढीसाठी भगवं वस्त्र आणलं, कलश नसल्याने तांब्या घेतला आणि आंघोळपांघोळ करून सगळ्यांनी गुढी ऊभारली. आजूबाजूच्या मंडळींना आम्ही हे काय करतोय काहीच कळत नव्हतं. गुढी ऊभारली, आता पुढे काय... गोडाचं जेवण पाहीजेच. पण मराठी पदार्थ मिळणार कुठे ? प्रत्येकाने आपापली अक्कल लढवली, मी आणि सचिन श्रीखंड शोधायला बाहेर पडलो. (हैद्राबादमध्ये श्रीखंड शोधणं हे वाळवंटात पाणी शोधण्यापेक्षा कठीण काम होतं हे तेव्हा कळालं) घरी आशिष आणि हुंजे ने पु-या बनवायला घेतल्या. आमच्या घराच्या समोरच राहणा-या केतकी लोणकर-जोशीने बटाट्याची भाजी आणि काहीबाही पदार्थ बनवले होतं. कायकाय उपद्व्याप करून सगळ्यांनी अथक प्रयत्नांनी मराठमोळ्या पद्धतीचं जेवण बनवलं आणि पंचपक्वान्न मिळाल्याच्या आनंदात फस्त केलं.
Comments
Post a Comment