ई टीव्ही सोडलं तरी त्या चॅनलशी असलेली जवळीक ही आयुष्यभर आहे तशीच राहील...अनेक बरे वाईट प्रसंग या चॅनलमध्ये काम करताना अनुभवायला मिळाले. अनुभवाची पहिली पायरी म्हणून ज्या संस्थेची ओळख आहे त्या संस्थेत काम करताना नेहमीच काही ना काही शिकून माणसं बाहेर पडली आहेत. मी ही त्याला अपवाद नव्हतो...या संस्थेशी असलेल्या जवळकीमुळेच सोबत काम करणारे कोणी भेटले तर मस्त धमाल येते. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना ईटीव्हीतला एक जुना मित्र सचिन गडहिरे वारंवार भेटत असतो. अर्थसंकल्पाच्या दिवशी आम्ही योगायोगाने एकत्र बसलो होतो. तेव्हा बोलता बोलता तो सहज बोलून गेला की ईटीव्हीत होती तशी मजा आता काही येत नाही (काही लोकं 8 तास सरकारी ड्युटी मुळे खूश असायची) त्याच्या बोलण्यातला अर्थ थोडा वेगळा होता कारण आम्ही एकत्र हैद्राबाद आणि मुंबई दोन्हीकडे काम केलं होतं. खासकरून आशिष चांदोरकर आणि सचिन गडहिरेला वरिष्ठांना उलट बोललण्यामुळे सलग काही आठवडे नाईट शिफ्ट देण्यात आली होती, या दोघांबरोबर मी आणि सचिन फुलपगारे (या दोघांचे हेल्पर म्हणून) आमचीही डुयटी लावण्यात आली होती. आमच्या चौघांमध्ये नेहमीच कॉर्डीनेशन जबरदस्त होतं ज्यामुळे नाईट शिफ्ट कोणत्याही त्रासाशिवाय पार पडली (फक्त पहाटे भयंकर झोप यायची, त्यावरही मात कशी केली हे माझं मलाच माहित आहे)
ईटीव्हीयन्स आजही अनेक ठिकाणी एकत्र काम करत असतात, पार्टीमध्ये भेटत असतात, त्यांच्यामध्ये कटु प्रसंग आलेले मी फार क्वचित पाहीलेले आहेत. प्रत्येक संस्थेमध्ये मग तो चॅनल असो किंवा पेपर एक तरी ईटीव्हीमधला माणूस शंभर टक्के असणारच... आय.बी.एन 7 मध्ये आलो तेव्हा “बंडू शेठ” शिरीश जाधव जाधव, दिपक शितोळे , सचिन जोशी आणि केतकी लोणकर-जोशी (जिला मी नेहमी “चेटकू” चिडवायचो) हे दांपत्य अशी अनेक मंडळी नव्या संस्थेत पुन्हा नव्याने भेटली. बरं वाटतं या सगळ्यांना पुन्हा भेटून, फक्त हीच मंडळी नाहीतर अनेक कॅमेरामन देखील भेटले ज्यात, गणेश काळे, दिपेश शिंदे, प्रवीण शेट्टी, उमेश गोविलकर, पडवळकर आणि अनेक मंडळी भेटली. प्रत्येक वेळा जाणवतं की मधल्या काळात काही कारणांमुळे संवाद तुटला असला तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. जेव्हा सगळे एक दुस-यासमोर येतात तेव्हा पुन्हा पहिल्यासारखेच मित्र झालेले असतात.
हैद्राबादला काम करत असताना माझ्या बरोबर राहणा-या, सचिन फुलपगारे, आशिष चांदोरकर, अमित जोशी, सचिन देशपांडे, राजेंद्र हुंजे ही मंडळी आज वेदवेगळ्या ठिकाणी आहेत. मात्र यातलं कोणीही कुठेही भेटलं तरी जुन्या आठवणी निघाल्या नाही असं कधीच झालेलं नाही. बरेच दिवसांपासून ईटीव्ही च्या दिवसांबद्दल लिहायचं मनात आहे पण जमत नाहीये. लिहण्यासारखं बरंच आहे पण कुठून आणि कसं सुरू करायचं हा मोठा प्रश्न आहे. आपल्यापैकी कोणी मदत केली तर नक्की आनंद होईल.
Comments
Post a Comment