वारी सुरू झालीय. स्टार माझामध्ये असताना दोन वर्ष वारी कव्हर केली. गेली दोन-तीन वर्ष काही जायला मिळालं नाही. ‘ वारी ’ हे दोन शब्द आजही ऐकले की नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. शून्य माहिती होती वारीबद्दल, पण वारी हा विषय असा आहे की तो पाठांतर आणि रिसर्च करण्यापेक्षा स्वत अनुभवून लोकांपर्यत पोचवणं जास्त सोपं असतं. अनेक लोकं स्वतला वारी स्पेशल तज्ञ म्हणवतात, पण वारीतला खरा तज्ञ असतो तो मैलो-न-मैल चालणारा वारकरी, जो कधीच काहीच बोलत नाही. शहरात राहणा-या मंडळींचं वारीबद्दलचं ज्ञान म्हणजे खेडड्यातल्या गावंढळ लोकांची एक यात्रा एवढंच असतं. मात्र ही यात्रा नसून जीवन म्हणजे काय हे देहू-आळंदी ते पंढरपूर या प्रवासादरम्यान समजवून सांगणारा प्रवास असतो. वारी बदलत चालली आहे. शेतक-यांबरोबर हायप्रोफाईल लोकंही वारीत सहभागी होतात, अविनाश भोसले आपल्या लव्याजम्यासोबत वारीत चालतात, आय.टी.वाले , विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी वारीत जेवढं जमेल तेवढं अंतर पार करताना दिसतात. कित्येक विदेशी मंडळीही दिंड्या,पताका घेऊन चालताना दिसतात. एरवी ज्यांच्याकडे लोकं पहातही नाही अशी मंडळी वारीतले हिरो असतात. प्...